लिंगायत समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय; तातडीची कामे महापालिका, मोठी कामे आमदार निधीतून
इचलकरंजी :
शहरातील लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने इचलकरंजी महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत तातडीने पूर्ण होणारी कामे महापालिकेमार्फत हाती घेण्याचा, तर मोठ्या निधीची आवश्यकता असलेली विकासकामे आमदार निधीतून टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सांगली रोडवरील महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह व उद्यानात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारणे, उद्यानाचा विकास, काळा ओढा परिसरातील जुन्या स्मशानभूमीतील अडचणी दूर करणे, तसेच निरामय हॉस्पिटललगतच्या नवीन स्मशानभूमीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी तातडीची कामे त्वरित सुरू करण्यात येतील, असे स्पष्ट केले. तर आमदार राहुल आवाडे यांनी मोठ्या आर्थिक तरतुदीची विकासकामे आमदार निधीतून पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. बैठकीनंतर संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले असून, लिंगायत समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
आ.राहुल आवाडे व आयुक्त पल्लवी पाटील यांचा सन्मान करताना लिंगायत समाजाचे प्रतिनिधी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





