ICHMH51NEWS.IN
9921600800

वादग्रस्त आयुक्तांच्या मुद्द्यावर भाजपमध्ये दोन गट आमनेसामने; हाळवणकर गट मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, आवाडे गट आयुक्तांच्या समर्थनात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वादग्रस्त आयुक्तांच्या मुद्द्यावर भाजपमध्ये दोन गट आमनेसामने; हाळवणकर गट मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, आवाडे गट आयुक्तांच्या समर्थनात

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्याभोवती निर्माण झालेल्या वादामुळे भाजपमधील आवाडे व हाळवणकर गटातील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून, हाळवणकर समर्थक नगरसेवक मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आयुक्तांविरोधातील तक्रारी मांडणार आहेत. त्याचवेळी आवाडे समर्थक नगरसेवक आयुक्तांच्या समर्थनार्थ भूमिका घेत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी काही नगरसेविकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत हाळवणकर समर्थक नगरसेवकांनी नुकतीच कोल्हापुरात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. या भेटीत आयुक्तांच्या कथित वागणुकीबाबत तसेच आमदार राहुल आवाडे यांचा महापालिकेच्या प्रशासनातील वाढता हस्तक्षेप याविषयी सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. आयुक्तांच्या कार्यपद्धतीशी संबंधित कायदेशीर बाबींचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या भेटीदरम्यान महापालिकेतील वाढत्या विसंवादाबाबत आपण माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थितांना दिल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, सोमवारी आमदार राहुल आवाडे विविध बैठकींच्या निमित्ताने महापालिकेत आले असता त्यांनी उपमहापौर दालनात भाजप नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आयुक्तांची बाजू मांडत काही नगरसेवकांना खडे बोल सुनावल्याची चर्चा आहे. आयुक्तांविरोधात तक्रारी करण्याऐवजी त्यांच्या कार्यकाळाला सहकार्य करावे, अन्यथा आयुक्तांच्या समर्थनार्थ आपणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगितले जाते.
या घडामोडींमुळे वातावरण आणखी तापले असून, वादाला कंटाळून एका समिती सभापतींनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यानंतर स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी आवाडे समर्थक नगरसेवकांच्या उपस्थितीत आमदार राहुल आवाडे यांना आयुक्त पल्लवी पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन दिले.
आयुक्तांच्या मुद्द्यावरून भाजपमधील आवाडे आणि हाळवणकर गटातील संघर्ष अधिक तीव्र होत असून, या अंतर्गत वादाचा थेट परिणाम महापालिकेच्या निर्णयप्रक्रिया व विकासकामांवर होत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

बोगस बिगरशेती आदेशांच्या आधारे कोट्यवधींचे दस्त? इचलकरंजीतील व्यवहारांची फौजदारी चौकशीची मागणी” महसूल मंत्र्यांसह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार; गट क्रमांकांतील व्यवहार रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी