ICHMH51NEWS.IN
9921600800

अण्णा भाऊंची लेखन प्रेरणा अस्सल व अव्वल होती…प्रबोधन वाचनालयात चर्चासत्र 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अण्णा भाऊंची लेखन प्रेरणा अस्सल व अव्वल होती…प्रबोधन वाचनालयात चर्चासत्र 

इचलकरंजी:

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे समाजातील शेवटच्या माणसाच्या शृंखला तोडणारा घाव आहे. वंचितांच्या वेदनामुक्तीचा मार्ग आहे.विचारांचा झंझावात असणाऱ्या अण्णाभाऊंची लेखनप्रेरणा घेऊन लेखन केले तर अस्सल व अव्वल दर्जाची साहित्यनिर्मिती होऊ शकते.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्यात दिलेल्या अमूल्य व भरीव योगदानाच्या गौरवाप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने यावर्षी

त्यांचा जन्मदिन ‘ लेखन प्रेरणा दिन ‘ म्हणून साजरा होतो आहे ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे असे मत लेखन प्रेरणा दिना निमित्त आयोजित चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने हे चर्चासत्र तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ लेखक डॉ. रफिक सूरज आणि प्रा. डॉ. सुभाष जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रसाद कुलकर्णी , अजित मिणेकर, प्रा . रोहीत शिंगे,पांडुरंग पिसे, महेंद्र जाधव  ,सौदामिनी कुलकर्णी, मानसी तगारे , कुमार मिणचे,रमेश चचडी ,धोंडीराम शिंगारे ,पांडुरंग आगम, शिवाजी मोरे आदी उपस्थित होते.

या चर्चासत्रात असे मत मांडले गेले की,वाट्याला आलेले जीवन समरसून जगण्याचा कैफ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यात होता.अवघ्या सोळा वर्षाच्या अण्णा भाऊंनी परिस्थितीची हाक ओळखून स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून दिले होते. कार्यकर्त्याचा व कलावंताचा पिंड असणारे ते लेखक होते. लोकांच्या वेदना,संवेदना,मानवी मनोव्यापाराची विविध रूपे त्यांच्या लेखणीतून बाहेर पडू लागली.अण्णा भाऊ साठे यांचे लेखन कथा,कादंबरी,नाटक,लोकनाट्य,लेख,कविता,प्रवासवर्णने आदी माध्यमातून प्रकट होऊ लागले.त्यांना लोकमान्यता मिळू लागली कारण त्यांचे लेखन जीवनाची आणि बदलाची मांडणी करणारे होते. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणे अतिशय योग्य आहे.

अभिवादन करताना समाजवादी प्रबोधिनीचे कार्यकर्ते

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा