डीकेटीई सिव्हीलच्या अदनान महातची ऑस्ट्रेलियातील विद्यापीठात रु. ९५ लाखांच्या शिष्यवृत्तीवर निवड
इचलकरंजी, ता. १ :
डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी अदनान महात याची ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी येथे मास्टर ऑफ प्रोफेशनल इंजिनिअरिंग (सिव्हील इंजिनिअरिंग) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या शिक्षणासाठी त्याला भारत सरकारकडून सुमारे रु. ९५ लाखांची प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
१८५० मध्ये स्थापन झालेले युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने आणि जागतिक दर्जाचे विद्यापीठ असून, क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये त्याचा १८वा क्रमांक आहे. या अभ्यासक्रमासाठी जगभरातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, भारतातून आयआयटी आणि एनआयटीसारख्या नामांकित संस्थांबरोबर डीकेटीईच्या विद्यार्थ्याची झालेली निवड ही संस्थेसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन क्षमता, प्रकल्प, व्यक्तिमत्त्व आणि मुलाखतीतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे अदनानची निवड झाली. डीकेटीईमधील आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाला पोषक वातावरण आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाल्याची भावना अदनानने व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ. एस. के. पाटील तसेच सिव्हील विभागातील प्राध्यापकांनी अदनानचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ऑस्ट्रेलियात शिष्यवृत्तीवर निवड झालेले विद्यार्थी अदनान महात यांचा सत्कार करताना संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ. एस. के. पाटील व सिव्हील विभागातील प्राध्यापक.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







