देश व समाजासाठी योगदान देण्यात ब्राह्मण समाज नेहमीच आघाडीवर : चंद्रचूड गोंगले
इचलकरंजी :
ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण असून ब्राह्मणत्वाची व्याख्या व्यापक आणि सर्वव्यापी आहे. देश, समाज व मानवतेच्या सेवेसाठी त्यागाची वेळ आली की ब्राह्मण समाज नेहमीच पुढे राहिला आहे. सरकारकडून काहीही अपेक्षा न ठेवता आपण देशासाठी काय देऊ शकतो, हा विचार या समाजाने सातत्याने कृतीतून सिद्ध केला आहे, असे प्रतिपादन निवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रचूड गोंगले यांनी केले.
इचलकरंजी ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी श्री परशुराम, लोकमान्य टिळक आणि श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार गोपाळ (उल्हास) चिंतामण लेले यांना प्रदान करण्यात आला. तसेच संतोष साधले, स्नेहल दंडगे, डॉ. श्रीकृष्ण काळे आणि श्रीकृष्ण गोरे यांना श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार पुरस्कार, वेदमूर्ती विश्वजित मणेरीकर यांना वेदोनारायण पुरस्कार, तर मैत्री फाउंडेशन, इचलकरंजी यांना सेवाभावी संस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी प्रसाद कुलकर्णी यांनीही ब्राह्मण समाजाच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा गौरव केला. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी परशुराम मंदिरासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमास ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण प्रसंगी चंद्रचूड गोंगले, माजी मंत्री प्रकाश आवाडे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







