इचलकरंजीमध्ये प्रथमच बुद्धिबळ सॉल्व्हिंग स्पर्धा; विजेत्यांना ५ हजारांची बक्षिसे
इचलकरंजी (प्रतिनिधी) : केन चेस अकॅडमी, इचलकरंजीच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत बुद्धिबळ शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता इचलकरंजीच्या इतिहासात प्रथमच ‘१ला केन बुद्धिबळ सॉल्व्हिंग कप २०२६’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा केन चेस अकॅडमी व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच चेसबेस इंडिया आणि वर्ल्ड फेडरेशन फॉर चेस कंपोझिशन (WFCC) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी FIDE D.I. रोहित पोळ मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत. प्रकल्प अध्यक्ष म्हणून CC L.N. कृष्णावतार भराडिया, तर स्पर्धेचे संचालक म्हणून चेसबेस इंडियाचे शतानिक मुखुति जबाबदारी सांभाळणार आहेत.
स्पर्धा दोन गटांमध्ये होणार असून प्रत्येक स्पर्धकाला केवळ एका गटात सहभागी होता येणार आहे. श्रेणी १ मध्ये अनुभवी व आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंसाठी ८ बुद्धिबळ कोडी सोडविण्यासाठी १५० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. यामध्ये २, ३ व ४ चालीत मात तसेच एंडगेम स्टडी आदी प्रकारांचा समावेश असेल.
श्रेणी २ नवोदित व मध्यम स्तरावरील खेळाडूंसाठी असून त्यामध्ये ६ कोडी सोडविण्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. या गटात २ व ३ चालीत मात तसेच एंडगेम स्टडी प्रकारांचा समावेश असेल.
स्पर्धेसाठी एकूण ५ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून ती WFCC च्या अनुदानातून देण्यात येणार आहेत. श्रेणी १ साठी ३ हजार ५०० रुपये आणि श्रेणी २ साठी १ हजार ५०० रुपयांची बक्षिसे आहेत. श्रेणी १ मध्ये प्रथम १,२५० रुपये, द्वितीय १,१५० रुपये व तृतीय १,१०० रुपये, तर श्रेणी २ मध्ये प्रथम ८०० रुपये, द्वितीय ४०० रुपये व तृतीय ३०० रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. बक्षिसासाठी किमान दोन रचना अथवा कोडी अचूक सोडविणे आवश्यक आहे.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून सहभागी स्पर्धकांना Algebraic Notation चे ज्ञान असणे आवश्यक आहे. स्पर्धकांच्या तयारीसाठी मोफत वेबिनारचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच स्पर्धेतील सर्व कोडींची उत्तरे व त्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी रविवार, ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता ऑनलाइन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या वेळेत कै. बाळासाहेब दाते ब्लड सेंटर, दाते मळा, इचलकरंजी येथे पार पडली. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २०० रुपये होते. अधिक माहितीसाठी ९६५७३३३९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






