ICHMH51NEWS.IN
9921600800

यंत्रमागधारकांसाठी सक्तीची ऑनलाइन नोंदणी कायमस्वरूपी रद्द करा ऑल महाराष्ट्र पॉवरलूम फेडरेशनचे लोकप्रतिनिधीना निवेदन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

यंत्रमागधारकांसाठी सक्तीची ऑनलाइन नोंदणी कायमस्वरूपी रद्द करा

ऑल महाराष्ट्र पॉवरलूम फेडरेशनचे लोकप्रतिनिधीना निवेदन

इचलकरंजी : राज्यातील यंत्रमाग उद्योगाला देण्यात येणाऱ्या वीज सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाने सक्तीची केलेली ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया कायमस्वरूपी रद्द करावी, अशी मागणी ऑल महाराष्ट्र पॉवरलूम फेडरेशनने आमदार राहुल आवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यंत्रमाग उद्योगाच्या वीज सवलतीसाठी सरकारने ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट व किचकट असून, राज्यातील यंत्रमागधारकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे फेडरेशनने निवेदनात म्हटले आहे. याबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊन ऑनलाइन नोंदणीची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतरही नोंदणीसाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली.

मुदतवाढ देऊनही भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, धुळे, सोलापूर, विटा आदी प्रमुख यंत्रमाग केंद्रांतील यंत्रमागधारकांनी सक्तीच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे, असे फेडरेशनने म्हटले आहे.

सरकारला आवश्यक असलेली माहिती मिळविण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन नोंदणीची सक्ती करण्याची आवश्यकता नाही. यंत्रमागधारकांच्या वीज बिलावरील ग्राहक क्रमांकाच्या आधारे संबंधित माहिती व डाटा संकलित केल्यास सरकारला आवश्यक असलेली संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे यंत्रमागधारकांना ऑनलाइन नोंदणीसाठी सक्ती करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

सक्तीची ऑनलाइन नोंदणी सुरूच ठेवल्यास राज्यातील यंत्रमाग उद्योगात तीव्र असंतोष निर्माण होऊन उद्योग बेमुदत बंद पडण्याची अथवा शेजारील राज्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता असल्याचा इशारा फेडरेशनने दिला आहे.

शेतीनंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणारा यंत्रमाग उद्योग असल्याने तो अडचणीत आल्यास राज्यातील लाखो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होईल. तसेच शासनाच्या महसुलातही मोठी घट होऊ शकते. त्यामुळे यंत्रमाग उद्योगाच्या हितासाठी सक्तीची ऑनलाइन नोंदणीची अट कायमस्वरूपी रद्द करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर विनय महाजन, किरण मारुती तारळेकर,  यांच्यासह विविध यंत्रमाग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

खा.धैर्यशील माने व आ.राहुल आवाडे यांना निवेदन देताना ऑल महाराष्ट्र पॉवरलूम फेडरेशनचे पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा