मराठा आरक्षणासाठी इचलकरंजीत भव्य मोर्चा; जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा
इचलकरंजी (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इचलकरंजी शहर व परिसरातील मराठा बांधवांनी शुक्रवारी प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी शिरस्तेदार संजय काटकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
मराठा-कुणबी नोंदींची सखोल तपासणी करून पात्र व्यक्तींना दाखले द्यावेत, अप्रकाशित रेकॉर्डची मोडी अभ्यासकांकडून फेरतपासणी करावी तसेच तहसील कार्यालयातील दाखले देण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या कथित गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
हातकणंगले तालुक्यातील जुन्या महसूल व पुरातत्व दप्तरांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे, ‘सारथी’ व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला प्रत्येकी किमान एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा तसेच जात पडताळणीची प्रकरणे अनावश्यक कारणांनी प्रलंबित ठेवू नयेत, अशाही मागण्या करण्यात आल्या.
शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. मुख्य मार्गावरून श्री शंभूतीर्थ मार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर पोहोचला. भगवे झेंडे, भगव्या टोप्या आणि ‘एक मराठा, लाख मराठा’सह विविध घोषणांच्या फलकांनी मोर्चाचे लक्ष वेधले.
प्रांत कार्यालयात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. पुंडलिक जाधव, वसंतराव मुळीक व सागर चाळके यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चात विविध मान्यवरांसह मराठा बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






