ICHMH51NEWS.IN
9921600800

शालेय क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाइन पोर्टलमधील अडचणींसंदर्भात लवकरच मार्ग काढला जाईल : आमदार डॉ. राहुल आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शालेय क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाइन पोर्टलमधील अडचणींसंदर्भात
लवकरच मार्ग काढला जाईल : आमदार डॉ. राहुल आवाडे

इचलकरंजी –
शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंची नोंदणी, संघ निवड, प्रवेश शुल्क भरणे, ओळखपत्र निर्मिती आदी सर्व प्रक्रिया यावर्षीपासून महाराष्ट्र शासनाच्या नवीन ऑनलाइन पोर्टलद्वारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या नव्या प्रणालीचा वापर करताना क्रीडाशिक्षकांना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व अडचणींचा लवकरच मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
नवीन ऑनलाइन पोर्टलवर खेळाडूंची नोंदणी करताना क्रीडाशिक्षकांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिना सुरू झाला तरी अद्याप शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांना अपेक्षित गतीने सुरुवात होऊ शकलेली नाही. या संदर्भात हातकणंगले तालुका शारिरीक शिक्षक संघटनेच्या वतीने महानगरपालिका क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे, प्रा. शेखर शहा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करुन यातून मार्ग काढण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

शेखर शहा यांनी ऑनलाइन पोर्टलसंदर्भातील सर्व समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच क्रीडा स्पर्धांदरम्यान खेळाडूंसोबत क्रीडाशिक्षकांची उपस्थिती अत्यंत आवश्यक असते. मात्र, काही वेळा संबंधित क्रीडाशिक्षकांना स्पर्धांसाठी पाठविण्याबाबत टाळाटाळ होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून, क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडाव्यात आणि खेळाडूंची योग्य काळजी घेतली जावी यासाठी ज्या क्रीडाशिक्षकांना स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत, त्यांना आवश्यक सहकार्य करून स्पर्धास्थळी पाठविण्याबाबत योग्य सूचना देण्यात याव्यात, असे सांगितले. तसेच क्रीडा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता अधिकार्‍यांनी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचे आश्‍वासन दिले. शिवाय इचलकरंजीतील संबंधित आरोग्य संस्थांशी तातडीने संपर्क साधून 14 वर्षांखालील खेळाडूंना  मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आमदार आवाडे यांनी दिल्या.
दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहर व परिसरातील क्रीडाशिक्षकांची बैठक मृगेंद्रअण्णा सुलतानपुरे विद्यामंदिर येथे पार पडली. बैठकीमध्ये नवीन ऑनलाइन पोर्टलमुळे निर्माण होणार्‍या अडचणी, जुन्या पोर्टलचा वापर करण्याची शक्यता, प्राथमिक प्रवेशिका व प्रवेश फी संदर्भातील समस्या तसेच 8 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या बुद्धिबळ स्पर्धांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक क्रीडाशिक्षकांनी आपल्या अडचणी मांडल्या. क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक शेखर शहा तसेच उपस्थित ज्येष्ठ क्रीडाशिक्षकांनी यासंदर्भात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महानगरपालिका क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक शेखर शहा, क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे क्रीडाशिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी, संभाजी बंडगर, विश्‍वनाथ माळी, अमित कागले, शिला माने, मलिक मणेर, श्याम कांबळे, अमित कुंडले, रवी चौगुले, कृष्णा आडकिल्ला, के. ए. पाटील, सागर पाटील, तुषार जगताप, संदीप फासे यांच्यासह क्रीडाशिक्षक उपस्थित होते.

आ.राहुल आवाडेना निवेदन देताना क्रीडा क्षेत्रातील मान्यवर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा