पीएमई बससाठी आकर्षक लोगो सुचविण्याचे आवाहन
निवडलेल्या उत्कृष्ट लोगोला रोख २१ हजार रुपये व सन्मानचिन्ह
इचलकरंजी, दि. ४ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत सुरू करण्यात येणाऱ्या पीएमई बस सेवेचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर पीएमई बस सेवेसाठी आकर्षक, वैशिष्ट्यपूर्ण व शहराची ओळख अधोरेखित करणारा लोगो निश्चित करण्यात येणार असून, नागरिक, विद्यार्थी, कलाकार, डिझायनर तसेच सर्व इच्छुकांकडून लोगोच्या संकल्पना मागविण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उत्कृष्ट लोगोच्या संकल्पनेला रोख २१ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
पीएमई बस सेवा इचलकरंजीच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, या बस सेवेची स्वतंत्र व प्रभावी ओळख निर्माण करण्यासाठी लोगो निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराची ओळख, संस्कृती, विकासाची वाटचाल आणि महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे प्रतिबिंब लोगोमध्ये उमटावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
इच्छुकांनी आपला आकर्षक लोगो दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावा अथवा mun.comm.imc@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. प्राप्त झालेल्या लोगोमधून पीएमई बस सेवेची ओळख प्रभावीपणे दर्शविणारा उत्कृष्ट लोगो निवडण्यात येणार आहे.
पीएमई बस सेवेचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी होणार असून, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि प्रकाश आवाडे उपस्थित राहणार आहेत.
इचलकरंजी शहराच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीला साजेसा लोगो तयार करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या सर्जनशीलतेचा वापर करावा, असे आवाहन परिवहन सभापती सौ. अरुणा प्रमोद बचाटे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
यावेळी महापौर उदय धातुंडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेवक योगेश पाटील, सुशांत कलागते, सुनील पवार, नागेश पाटील आदी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






