इचलकरंजीत पीएम ई-बस सेवेचा उत्साहात शुभारंभ
३० सप्टेंबरपर्यंत शहरवासीयांना मोफत प्रवासाची सुविधा
इचलकरंजी, दि. ११ : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक स्वरूप देणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस सेवा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम ई-बस आगाराचा लोकार्पण सोहळा सोलगे मळा येथे उत्साहात पार पडला. खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते ई-बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, विरोधी पक्षनेते उदय पाटील, महिला व बालकल्याण सभापती रुपाली सातपुते, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, समाजकल्याण सभापती रुबन आवळे, परिवहन उपायुक्त नंदु परळकर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पीएम ई-बस सेवेमुळे इचलकरंजीकरांना आधुनिक, सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. इलेक्ट्रिक बसमुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन वायू तसेच ध्वनी प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकार्पणानंतर मान्यवरांनी ई-बसची पाहणी करून बसमधील आधुनिक सुविधांची माहिती घेतली. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून ई-बस शहरातील विविध प्रमुख मार्गांवर रवाना करण्यात आल्या. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवरून एकाचवेळी ई-बसचा ताफा धावताना पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली.
३० सप्टेंबरपर्यंत मोफत प्रवास
ई-बस सेवेच्या शुभारंभानिमित्त महानगरपालिकेने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत शहरवासीयांसाठी ई-बस प्रवास मोफत ठेवला आहे. नव्या सार्वजनिक वाहतूक सेवेची नागरिकांना माहिती व्हावी आणि अधिकाधिक नागरिकांनी तिचा वापर करावा, या उद्देशाने ही सुविधा देण्यात आली आहे.
खासदार धैर्यशील माने यांनी औद्योगिक शहरासाठी सक्षम व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याचे सांगितले. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी ई-बस सेवा ही शहराच्या आधुनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे नमूद केले. आयुक्त पल्लवी पाटील यांनी सेवा सुरळीत चालविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.
ई-बस सेवेच्या शुभारंभामुळे इचलकरंजीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, स्वच्छ, हरित, आधुनिक आणि शाश्वत शहराच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
झेंडा दाखवून इ बस सेवेचा शुभारंभ करताना खा.धैर्यशील माने,आ.राहुल आवाडे व मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






