पहिल्या केन चेस सॉल्व्हिंग कपमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विजेते
इचलकरंजीच्या बुद्धिबळ क्षेत्राची ऐतिहासिक कामगिरी
इचलकरंजी (प्रतिनिधी) : वर्ल्ड फेडरेशन फॉर चेस कंपोझिशन (WFCC), चेसबेस इंडिया, केन चेस अकादमी आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या केन चेस सॉल्व्हिंग कप स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सहा पारितोषिके पटकावली.
कै. बाळासाहेब दाते ब्लड सेंटर, दाते मळा येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण ३५ खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेतील दोन्ही श्रेणींमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी वर्चस्व राखले. विशेष म्हणजे केवळ पाच वर्षांच्या कु. निश्चय ऐतवडे (नांदेड) याने सहभाग नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुलींचाही उत्स्फूर्त सहभाग राहिला.
श्रेणी १ मध्ये अभय भोसले (जांभळी) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तन्मय पवार व अथर्व सुतार (इचलकरंजी) यांनी संयुक्त द्वितीय, तर अथर्व तावरे (इचलकरंजी) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
श्रेणी २ मध्ये सुबोध कुलकर्णी (कोल्हापूर) प्रथम, तर अर्णव वरुटे (इचलकरंजी) द्वितीय क्रमांकावर राहिले.
विजेत्यांना बक्षिसे तसेच सहभागी खेळाडूंना WFCC अध्यक्ष मारियन कोव्हासेविच व इव्हेंट डायरेक्टर शतानिक मुखुटी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ, रेश्मा नलवडे, कृष्णावतार भराडिया, रेखा सारडा, श्रद्धा सातपुते व सुनीता अग्रवाल यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





