ICHMH51NEWS.IN
9921600800

हुपरीत ६०० कोटींचा बहुराज्यीय ‘झिरो वेस्ट’ प्रकल्प अमित शाह यांच्या हस्ते २० सप्टेंबरला पायाभरणी; १२०० जणांना रोजगार- माजी मंत्री प्रकाश आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हुपरीत ६०० कोटींचा बहुराज्यीय ‘झिरो वेस्ट’ प्रकल्प

अमित शाह यांच्या हस्ते २० सप्टेंबरला पायाभरणी; १२०० जणांना रोजगार- माजी मंत्री प्रकाश आवाडे

इचलकरंजी :

सहकारी तत्त्वावर आधारित ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेतून शेती उत्पादनासाठी सुमारे ६०० कोटी रुपये गुंतवणुकीचा बहुराज्यीय प्रकल्प हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ रविवार, २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साखर उद्योगातील बगॅस, मळी, स्पेंट वॉश, प्रेसमड आदी उपउत्पादनांवर प्रक्रिया करून त्यापासून उच्च मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यात येणार आहेत. स्पेंट वॉश व प्रेसमडपासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी), तसेच सायट्रिक अ‍ॅसिड आणि पोटॅश निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प हुपरीत उभारला जाणार आहे. ‘वेस्ट टू बेस्ट’ या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरणार आहे.

या प्रकल्पाचे नाव ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ असे असून, साधारण सात ते आठ साखर कारखान्यांमधील वेस्ट मटेरियलचा वापर करून संबंधित कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रकल्पामुळे सुमारे १२०० जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सहा महिन्यांत तयार करण्यात येणार असून, त्यानंतर आवश्यक शासकीय परवानग्या पूर्ण करून पुढील सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. त्यानंतर दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्याचे नियोजन आहे.

या प्रकल्पात नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट्स लिमिटेड, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन तसेच इंडियन पोटॅश आदी सहकारी संस्थांचा सहभाग राहणार आहे.

भारताला आयात करावे लागणारे पोटॅश, सायट्रिक अ‍ॅसिड आणि सीबीजी गॅस देशातच निर्माण झाल्याने परकीय चलनाची बचत होण्यास मदत होणार आहे. साखर उद्योग केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता उपउत्पादनांमधून अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करेल. त्यामुळे अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था मिळण्याबरोबरच साखरेचे दर नियंत्रणात ठेवणे आणि शेतकऱ्यांना योग्य दर देणे शक्य होईल, असे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

जून महिन्यात इचलकरंजी येथे कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बहुराज्य वर्गीकृत बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सहकार तत्त्वावर मोठा प्रकल्प राबविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तातडीने कार्यवाही करून हा प्रकल्प जवाहर कारखाना कार्यस्थळी आणण्यात यश आले असल्याचे आवाडे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला पूरक असा हा प्रकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पायाभरणी समारंभास केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर, केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, नामदार चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेस इंडियन पोटॅशचे व्हाईस प्रेसिडेंट नरेश शर्मा, केन अ‍ॅडव्हायझर डॉ. मल्लालीला, भानुजी, हर्ष मलिक, मार्केटिंग मॅनेजर सयाजी पाटील, जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले, प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, बाळासाहेब माने, मौश्मी आवाडे, सानिका आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, नरसिंह पारीक, सतीश मुळीक, महेश पाटील, शशिकांत मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा