रोटरी क्लब व इचलकरंजी पोलीस दलातर्फे श्री गणेशोत्सव डेकोरेशन व आरास स्पर्धेचे आयोजन
इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व इचलकरंजी पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहर मर्यादित श्री गणेशोत्सव डेकोरेशन व आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी डेकोरेशन स्पर्धा, तर शहरवासीय व रोटरी परिवारासाठी घरगुती आरास स्पर्धा घेण्यात येणार आहे.
सार्वजनिक मंडळांनी आपल्या गणेशोत्सव देखावा व डेकोरेशनची नावनोंदणी रोटरी श्रीमती सोनीदेवी रामबिलास बाहेती सेवा केंद्र, दाते मळा, महेश सेवा समितीजवळ येथे करावी. नोंदणी केलेल्या मंडळांचे परीक्षण रोटरी सदस्यांकडून प्रत्यक्ष जागेवर करण्यात येईल.
नशामुक्ती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना स्पर्धेत प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच पारंपरिक वाद्य व वेशभूषेत गणरायाचे आगमन व विसर्जन करणाऱ्या मंडळांना विशेष पुरस्कार देण्यात येतील. मिरवणुकीत डॉल्बी किंवा लेसर लाईटचा वापर करणाऱ्या मंडळांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.
घरगुती गणेशभक्तांनी गणपती व सजावटीचे फोटो तसेच पारंपरिक वेशभूषेत आरती करतानाचे फोटो ९८२२८६६५५१, ९३२६६०५२१२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत. फोटो पाठविण्याची अंतिम मुदत २० सप्टेंबर २०२६ आहे. आरास व सजावटीसाठी केवळ पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे बंधनकारक आहे.
प्रत्येक गटातील तीन विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी, प्रोजेक्ट चेअरमन प्रकाश रावळ व डीवायएसपी विक्रांत गायकवाड यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






