गणेश विसर्जनावेळी पंचगंगा नदीकाठी प्लास्टिक आणू नका
उपमहापौर अनिल डाळ्या यांचे गणेशभक्तांना आवाहन
इचलकरंजी : गणेश विसर्जनादरम्यान पंचगंगा नदीत प्लास्टिक व इतर अविघटनशील साहित्य जाऊ नये, यासाठी गणेशभक्तांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन उपमहापौर अनिल डाळ्या यांनी केले आहे.
पंचगंगा नदी ही इचलकरंजीसह संपूर्ण नदीखोऱ्याची जीवनवाहिनी आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिक श्रद्धेने नदीकाठी विसर्जनासाठी येतात. मात्र यावेळी प्लास्टिकच्या पिशव्या, सजावटीचे साहित्य, माळा, वेष्टने व अन्य अविघटनशील वस्तू नदीकाठावर तसेच नदीपात्रात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे विसर्जनानंतर हे साहित्य नदीतून बाहेर काढणे व त्याची विल्हेवाट लावणे महापालिकेसमोर आव्हान ठरते.
प्लास्टिक नदीत गेल्यानंतर त्याचे सूक्ष्मप्लास्टिकमध्ये रूपांतर होऊन जलचर, नदीचे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ‘प्लास्टिक नदीत नेऊ नका’, ‘निर्माल्य वेगळे, प्लास्टिक वेगळे’ आणि ‘प्लास्टिकमुक्त गणेश विसर्जन, निर्मळ पंचगंगेचा संकल्प’ या भावनेतून ‘शून्य प्लास्टिक पंचगंगा’ अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशभक्तांनी विसर्जनस्थळी प्लास्टिक व निर्माल्य नदीत न सोडता महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कुंडात जमा करावे, असे आवाहन उपमहापौर अनिल डाळ्या यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






