सहकारी सूतगिरण्यांच्या विकासाला नवी दिशा; प्रकल्प खर्च ₹११८ कोटी करण्याबाबत उच्चस्तरीय बैठक-अशोक स्वामींचा पुढाकार
मुंबई, दि. २३ : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या प्रकल्प अहवालाच्या किंमतीत सुधारणा करण्याबाबत मंत्रालय, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सहकारी सूतगिरण्यांच्या प्रकल्प अहवालाची किंमत ₹८०.९० कोटींवरून ₹११८ कोटी करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सहकारी सूतगिरण्यांच्या प्रकल्प अहवालाची किंमत ₹८०.९० कोटींवरून ₹११८ कोटी करण्याच्या कार्यवाहीचा शासनस्तरावर आढावा घेतला जात असल्याची माहिती यापूर्वीही वस्त्रोद्योग विभागाच्या आढाव्यात समोर आली होती.
२५,५३६ चात्यांच्या बांधकाम व यंत्रसामग्रीच्या कोटेशनच्या आधारे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाने वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांच्याकडे सुधारित प्रकल्प अहवाल सादर केला होता. वस्त्रोद्योग आयुक्तालयाने आवश्यक शिफारशींसह हा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.
बैठकीस आमदार रणधीर सावरकर, वस्त्रोद्योग सचिव शैला ए., वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, वस्त्रोद्योग उपसचिव श्रीकृष्ण पवार व खाजगी सचिव प्रल्हाद रोडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्प अहवालातील सुधारित खर्चामुळे सहकारी सूतगिरण्यांच्या पायाभूत सुविधा, आधुनिक यंत्रसामग्री आणि उत्पादन क्षमतेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सहकारी सूतगिरण्यांच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा शासनाच्या वस्त्रोद्योगविषयक आढाव्यातही महत्त्वाचा ठरला आहे.
बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,सचिव शैला ए, अशोक स्वामी व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

