आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार-आ.राहुल आवाडेंचा भाजप कार्यालयात सत्कार
इचलकरंजी –
इचलकरंजी विधानसभा मतदार संघात मिळालेल्या विक्रमी मताधिक्य म्हणजे सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नाचे यश आहे. म्हणूनच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भाजपाच्या कमळ या चिन्हावर म्हणजे स्वबळावर लढवायच्या असल्याचे सांगतानाच इचलकरंजी महानगरपालिकेत पहिला महापौर हा भाजपाचा असेल असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आमदार राहुल आवाडे यांचा शाल, श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर भाजपा शहर अध्यक्ष पै. अमृत भोसले, ताराराणी पक्ष विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांचाही सत्कार करण्यात आला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, इचलकरंजीत विक्रमी मताधिक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला यश मिळून 10-0 असा स्कोर झाला आहे. सांगितल्याप्रमाणे विरोधकांचा टांगा पलटी केला असून शहरातील काही राजकीय पक्षांचे शटर डाऊन झाले आहेत. हा विजय सर्वांनी मिळून एकजुटीने केलेला सामुहिक प्रयत्नांचा आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात महायुतीची दबदबा निर्माण झाला असून भाजपा एक नंबरचा पक्ष बनला आहे. आता मी आणि प्रकाश आवाडे आम्ही दोघे मिळून केवळ इचलकरंजीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढवू. याच सांघिक विजयाच्या बळावर आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणूका भारतीय जनता पार्टी म्हणून कमळ या चिन्हावर लढवायचा आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला असल्याचे नमुद करताना इचलकरंजी महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक हे भाजपाचे असतील आणि पहिला महापौर हा कमळ चिन्हाचा म्हणजेच भाजपाचा असेल. ज्यांनी भाजपाला अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांना पक्षात कोणतेही स्थान दिले जाणार नाही असे सांगतानाच अशांना प्रवेश द्यावयाचा असेल तर त्यासाठी हाळवणकर आणि आवाडे अशा दोघांची संमती घ्यावी लागेल, असा जणू इशाराच दिला.
ज्या ज्या बुथवर आपल्याला सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे अशा बुथप्रमुखांचा केवळ सत्कार नव्हे तर त्यांना रोख स्वरुपातील बक्षिसही देण्यात येईल. त्याचबरोबर लवकरच मोठा मेळावा घेऊन पुढील रणनिती ठरविण्यात येईल. राहुल आवाडे यांना मिळालेले यश हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे यश असून आगामी काळात निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय मिळेल असे सांगितले. सदस्य नोंदणी अभियान सुरु असून एका महिन्यात 50 हजार सदस्य नोंदणीचे लक्ष्य असल्याचे सांगतानाच सर्वांनी मिळून मिळालेल्या मताधिक्याइतकी म्हणजे 56 हजार 811 इतकी नोंदणी करुया असे आवाहन केले. त्याचबरोबर आमदार राहुल आवाडे यांनी 56 हजार 811 वृक्ष लागवडीचा केलेला संकल्प सर्वांनी मिळून पूर्णत्वास नेऊया, असेही ते म्हणाले.
माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी, सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांतून राहुल आवाडे यांना मोठा विजय प्राप्त करता आला. निवडणूकीत विरोधकांनी अगदी खालच्या पातळीवर जात जहरी टीका केल्या. पण आपण संयम ठेवून केवळ विकासकामे जनतेसमोर मांडली. आणि जनतेने आपल्याला साथ दिली. शिस्तबध्द नियोजनामुळे मतांमध्येही वाढ झाली असून ग्रामीण भागातूनही चांगली साथ मिळाली. त्याचबरोबर इचलकरंजी मतदारसंघात पूर्वी समाविष्ट 13 गावातून मिळालेल्या मताधिक्यामुळे लोकसभेत धैर्यशील माने आणि आता अशोकराव माने यांना मताधिक्य मिळाले. आता आपल्याला थांबायचे नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कमळ फुलवायचे असून भाजपा अधिक भक्कम करायची आहे. आता भाजपाशिवाय काही नाही असे सांगताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत केवळ कमळ आणि कमळच आणायचे आहे. आमदार हे पद मिरवायचे नसून ते जबाबदारी आहे, असा उल्लेख करताना तरुण आमदार राहुल आवाडे हे शहरातील वस्त्रोद्योग आणि पाणी प्रश्नासह प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावतील. त्यासाठी मी आणि हाळवणकर अशा दोघांचा अनुभव आणि मार्गदर्शन त्यांच्या पाठीशी राहिल. सर्वांशी समन्वय साधून आपण जोमाने कार्यरत होऊया. प्रामाणिकपणे कार्य करणार्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे बळ दिले जाईल. मी आणि हाळवणकर मिळून विनाअपघाताची बुलेट ट्रेन असून ती आता सुसाट धावेल, असा विश्वास दिला.
भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले यांनी स्वागत केले. याप्रसंगी मिश्रीलाल जाजू, सतिश डाळ्या, महावीर गाठ, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, तानाजी पोवार, उदय बुगड, अनिल डाळ्या, विकास चौगुले, शेखर शहा, नरसिंह पारीक, दीपक राशिनकर, मनोज साळुंखे, मनोज हिंगमिरे, संतोष शेळके, किसन शिंदे आदींसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार उमाकांत दाभोळे यांनी मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800