इचलकरंजी महानगरपालिकेचा आंतराष्ट्रीय पातळीवर गौरव हा तर संशोधनाचा विषय : शशांक बावचकर
इचलकरंजी –
इचलकरंजी शहरातील सद्याची पिण्याच्या पाण्याची होत असलेली गैरसोय, रस्त्यांची झालेली दूरवस्था, दैनंदिन स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याची समस्या असे नानाविध प्रश्न एैरणीवर असताना इचलकरंजी महानगरपालिकेला चक्क आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘पाणी व स्वच्छता क्षेत्रातील’ उत्कृष्ट उपक्रमांसाठी गौरविण्यात आले, हे हास्यास्पद आहे. संबंधित संस्थेने नेमक्या कोणत्या निकषांवर इचलकरंजी शहराची निवड केली हा संशोधनाचा विषय असल्याची टीका प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी प्रसिध्दी पत्रकात केली आहे. हे सर्व पाहता सध्या ज्याप्रमाणे अनेकांकडे डॉक्टरेट पदवी आहे, त्याचप्रमाणे इचलकरंजी महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले नाही ना? असा खोचक सवालही त्यांनी व्यक्त केला आहे.
टोरोंटो कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड वॉटर काँग्रेस एक्झिबिशनमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेला ‘क्लायमेट स्मार्ट युटिलिटीज रेकग्निशन प्रोग्राम’ अंतर्गत ‘पाणी व स्वच्छता क्षेत्रातील’ उत्कृष्ट उपक्रमांसाठी गौरविण्यात आल्याची माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. सुमारे ४ हजार शहरामधून इचलकरंजी शहराची निवड झाल्याचे त्यांनी नमुद केले आहे. या संदर्भात प्रदेश काँग्रेस सचिव बावचकर यांनी सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले, इचलकरंजी शहरात पिण्याच्या पाण्यासाठी दोन-दोन योजना असताना आठवड्यातून एक ते दोनवेळा पाणी दिले जाते. दैनंदिन स्वच्छता कामाचा बोजवारा उडाला असून जागोजागी कचर्याचे ढीग साचलेले दिसतात. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाच्या उपाययोजना तर कागदोपत्रीच असल्याचे दिसते. शिवाय वृक्ष लागवड असो, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वितरण व विल्हेवाट मशीन असो, जल स्त्रोतांचे पुनुरुज्जीवन असो यातील काही कामे झाली आहेत तर काही प्रस्तावित असल्याचे म्हटले आहे. पण प्रत्यक्षात काहीच उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. पाणी व स्वच्छता सेवांमध्ये सुधारणा करताना पर्यावरणाचे रक्षण यावर भर दिल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात काहीच दिसत नाही. अशी परिस्थिती असताना महानगरपालिकेस माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कसे जाहीर झाले याचाही शोध घेतला पाहिजे, असेही श्री. बावचकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर यामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या शहरांचा समावेश होता याचाही खुलासा आयुक्तांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यापूर्वी बसविण्यात आलेले मोबाईल टॉयलेट सॅनेटरी नॅपकीन मशीनमध्ये झालेला भ्रष्ट कारभार मीच उघडकीस आणला होता. त्याचे पुढे काय झाले? त्याचबरोबर शहरातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने महानगरपालिकेने त्यावर कोणता उपाय केला याचीही माहिती जनतेसमोर आणण्याची गरज असल्याचे श्री. बावचकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800