इचलकरंजीत २२ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
इचलकरंजी
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे स्व. दगडूलाल मर्दा स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे सोळावे वर्ष असून सदरची स्पर्धा येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र, नाकोडा नगर, इचलकरंजी येथे रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजतापासून सुरू होणार आहे.
सदरच्या वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांनी… समाज माध्यमे दशा आणि दिशा, वाटचाल तिसऱ्या महायुद्धाकडे, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व – आचार्य अत्रे, सत्तेच्या बाजारात मतदाराचे स्थान, सावधान पाणी पेटते आहे आणि देशातील स्त्रिया आणि मुलींची सुरक्षा यापैकी एका विषयावर विचार व्यक्त करायचे आहेत. सदरची स्पर्धा ज्युनिअर व सीनियर कॉलेज आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी खुली राहील. प्रत्येक स्पर्धकास जास्तीत जास्त दहा मिनिटे वेळ असून भाषा मराठी राहील.
स्पर्धा सहभागासाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. स्पर्धकाचे वय २५ वर्षाच्या आत असावे. स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक ५००० रुपये व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक ३००० रुपये व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक २००० रुपये व सन्मान चिन्ह आणि उत्तेजनार्थ १००० रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचबरोबर सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येतील.
नाव नोंदणीसाठी दिनांक १८ डिसेंबर २०२४ ही अंतिम तारीख असून स्पर्धेसाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश फी आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांना दोन्ही वेळचा प्रवास खर्च देण्यात येणार आहे तसेच सर्व स्पर्धकांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी अध्यक्ष, मनोरंजन मंडळ, दाते मळा सुंदर बागेजवळ, इचलकरंजी, जिल्हा- कोल्हापूर (दूरध्वनी ९८५०५८८८२५, ९९६०००१२०७ अथवा ८२३७५२२५२२) येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800