एकांकिका स्पर्धा दुसऱ्या दिवशी नातेसंबंधांचा वेध घेणारे नाट्याविष्कार.
इचलकरंजी:
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २६व्या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बहुतांश स्पर्धक संघांनी विविध प्रकारच्या नाते संबंधांचा वेध घेणा-या एकांकिका सादर करून उपस्थित रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली.
रुद्र प्रॉडक्शन इचलकरंजी या संघाने ‘असाही एक कलावंत’ ही गुढ आशयाची पहिली एकांकिका सादर केली. रत्नाकर मतकरी यांच्या मूळ कथेवर आधारीत कथेचे एकांकिका रुपांतर अमेय जोग व ओम जगताप यांनी केले होते तर दिग्दर्शन हर्षवर्धन कारंडे – देशमुख याने केले होते. खून करणे हा गुन्हा नसून ती एक कला आहे, त्यात नाविन्य आहे असे मानना-या दोन विकृत मानसिकतेच्या लेखकांची गोष्ट यामध्ये दाखविण्यात आली होती. त्यानंतर विनायक गणेश वझे महाविद्यालय, मुंबई या संघाने ‘स्पर्शाची गोष्ट’ ही बाप आणि मुलीच्या नात्यावरील भावस्पर्शी अशी एकांकिका सादर करून रसिकांची दाद घेतली. मच्छिंद्रनाथ याचे लेखन होते तर आनंद आणि मच्छिंद्रनाथ यांचे दिग्दर्शन होते. प्रत्येक स्पर्शाचं नातं हे वेगळं असतं आणि प्रत्येक नात्यातला स्पर्श वेगळा असतो, हे सांगणारी ही एकांकिका होती.
नभांत नाट्य संस्था, तासगाव या संघाने त्यानंतर ‘स्पर्श’ ही एकांकिका चांगल्या प्रकारे सादर केली. लेखन व दिग्दर्शन अमेय रुपाली राजेंद्र काळे याचे होते. एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात आणि त्यामधील चढ- उतारांनी भरलेला प्रवास या नाटकात दाखविण्यात आला. नंतरच्या धूळपाटी क्रिएशन इस्लामपूर या संघाच्या ‘साकव’ या एकांकिकेतही पती, पत्नी आणि मुलगी या कुटुंबातील संवाद कमी झाल्यामुळे निर्माण होणारा दुरावा आणि समस्या यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. लेखन हौसेराव हुबाले यांचे होते, तर श्रीराम गरगटे यांचे दिग्दर्शन होते.
स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात तंत्रज्ञान अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या संघाने श्रेयस आणि पार्थ लिखित ‘बांध’ ही एकांकिका सादर केली. दिग्दर्शन दृप्ता कुलकर्णी हिने केले होते. समाजात देवदासी स्त्रियांच्या बाबतीत होणारे अन्याय, त्यांची चिंताजनक परिस्थिती आणि ही परंपरा अजूनही समाजात कशी राहिली आहे यावरील ही संवेदनशील एकांकिका होती. त्यानंतर नाट्य शुभांगी, जयसिंगपूर या संघाने दिलीप परदेशी लिखित आणि सुभाष टाकळीकर दिग्दर्शित ‘फिनिक्स’ ही एकांकिका सादर केली. भीषण दुष्काळ आणि साथीचे रोग यामुळे यामुळे सर्व गावकरी गाव सोडून जातात आणि गाव ओस पडते त्यावेळी घडलेले नाट्य या एकांकिकेत दाखवण्यात आले. ज्येष्ठ कलाकारांचे दमदार सादरीकरण हे यामधील वैशिष्ट्य जाणवले.
अखेरच्या सत्रात तुमचं आमचं मुंबई या संघाने ‘ओल्ड मंक’ ही विनोदी ढंगातील एकांकिका सादर केली. वकील बाप आणि नोकरी करणारी आई, त्यांची तरुण मुले असलेल्या कुटुंबात व्यसनामुळे कशाप्रकारे वाद निर्माण होतात आणि नंतर ते कसे मिटतात याचे चित्रण यामध्ये करण्यात आले होते. शेवटची एकांकिका रंगयात्रा इचलकरंजी या संघाने चांगल्या प्रकारे सादर केली. कादंबरी माळी यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ‘चरचरणाऱ्या फॅन्टसीचे युद्ध’ या एकांकीकेत पुण्यामध्ये राहणाऱ्या व लिव्ह इन मध्ये असणाऱ्या एका जोडप्याच्या आयुष्यात आलेल्या एका गैरसमजामुळे कशाप्रकारे चढ-उतार होतात यावर परिणामकारक भाष्य केले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये होत असलेल्या या स्पर्धेत इचलकरंजी व परिसरातील रसिक नागरिकांचा तसेच विद्यार्थी आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800