कन्या महाविद्यालयात सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती या विषयावरती कार्यशाळा संपन्न.
इचलकरंजी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय येथे राज्यशास्त्र विभागामार्फत सामाजिक शास्त्रांमधील संशोधन पद्धती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत सदर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रो.डॉ.अर्चना कांबळे (जगतकर) समाजशास्त्र विभाग प्रमुख, न्यू कॉलेज कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी असे मत व्यक्त केले की, “संशोधनामागे प्रमुख हेतू मानव कल्याण आहे व तो असलाच पाहिजे. सामाजिक शास्त्रातील संशोधनांमध्ये प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव शोधणे गरजेचे असते. आजकाल IQ वाढला आहे, पण EQ चे काय? संशोधनांमधून शोधण्याचा आनंद मिळाला पाहिजे. समाज उपयोगी संशोधन होणे गरजेचे आहे.”असे त्या म्हणाल्या,
या कार्यशाळेत दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सुरेश शिखरे इतिहास विभाग प्रमुख,श्री शहाजी छत्रपती कॉलेज कोल्हापूर हे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये समाजव्यवस्थेतून आलेले संस्कारात्मक मूल्य व संस्कृती तसेच उज्वल परंपरा विसरून चालणार नाही, तर त्यांचे जतन करून ठेवणे गरजेचे आहे. त्यावर स्वतंत्र संशोधनाची गरज आहे.” या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे होते. ते अध्यक्षीय मनोगतात असे म्हणाले की, “सध्या समाजव्यवस्थेमध्ये संशोधन करण्यासाठी विविध विषय उपलब्ध आहेत. विद्यार्थिनींनी सामाजिक दृष्ट्या गरजेचे विषय निवडून त्यावर संशोधन करणे महत्त्वाचे आहे. संशोधन हे केवळ आत्मकल्याणाकरीता न करता व्यक्तिमत्वामध्ये आणि समाजामध्ये काहीतरी बदल घडावा म्हणून संशोधन करा,” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक अग्रणी महाविद्यालय योजना समन्वय प्रा. वर्षा पोतदार यांनी केले. या कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. किरण कानडे यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन डॉ. मनोज जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.स्वाती हळवणकर यांनी केले. या कार्यशाळेसाठी अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत सहभागी असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800