कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून ३८९ बेवारस वाहनांची लिलाव प्रक्रिया पुर्ण.
कोल्हापूर
पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्याच्या तपासात वेगवेगळी वाहने जप्त केली जातात तसेच काही वाहने ही गुन्हा करणेसाठी देखील वापरली जातात. याशिवाय वाहतूक अंमलदारांना मोटर वाहन केसेस दरम्यान बेवारस वाहने मिळून येतात. त्याच प्रमाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी जास्त कालावधीकरीता वाहने उभी असतात अशी वाहने देखील बेवारस वाहने म्हणून पोलीस ठाणेच्या अभिलेखावर जमा करणेत येतात. अशा वाहनाबाबत पोलीसांकडून वाहनाचे मुळ मालक शोधले जातात व त्यांना सदरची वाहने परत केली जातात. परंतु काही वाहनांचे मुळ मालक पोलीसांना मिळत नाही, त्यामुळे सदरचे वाहने ही वर्षानुवर्षे पोलीस ठाणेच्या आवारात लावून असतात. यामुळे पोलीस ठाणेचा परिसर मोठया प्रमाणात व्यापला जातोच शिवाय पोलीस ठाणेचा परिसर अस्वच्छ राहतो.
कोल्हापूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेच्या आवारात लागून असलेल्या बेवारस वाहनांची माहिती घेवून त्यांचे मालक शोधून ती वाहने परत करणे व ज्या वाहनांचे मालक मिळून येत नाहीत त्या वाहनांचे लिलावाची प्रक्रिया करणेसाठी मा. पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साो, कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश निर्गमित केले. तसेच बेवारस वाहनांच्या लिलावासाठी उप विभागीय अधिकारी श्री समीरसिंह साळवे, इचलकरंजी विभाग, यांचे अधिपत्याखाली एक पथक नेमले होते. सदर पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार मोरे अशांचा समावेश करणेत आला होता.
सदर पथकाने कोल्हापूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेंशी समन्वय साधून त्यांचेकडील बेवारस वाहनांची माहिती प्राप्त करुन घेतली. सर्व वाहनांची प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे मदतीने मालकांची माहिती घेवून त्यातील काही वाहनांचे, वाहन मालक शोधून त्यांचे कागदपत्रांची खात्री करुन, ती वाहने कायदेशीर प्रक्रियेने परत केलेली आहेत.
कोल्हापूर जिल्हयातील उर्वरीत ३८९ वाहने, ज्यामध्ये ३८५ दुचाकी व ०४ चार चाकी अशा वाहनांचे वाहन मालक मिळून न आलेने प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांचेकडून सदर वाहनांची किंमत निश्चित करण्यात आली. तसेच सदर ३८९ बेवारस वाहनांचा एकत्रित लिलाव २० जानेवारी रोजी सकाळी ११.०० वा पोलीस ग्राऊंड जवळ, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आयोजित करणेत आला होता. त्या करिता कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून प्रसिध्दी पत्रकाव्दारे लिलावात भाग घेणेसाठी अधिकृत व्यापारी असलेची कागदपत्रे व अनामत रक्कमेसह हजर राहणेचे आवाहन वृत्तपत्र समाज माध्यमाव्दारे करणेत आले होते.
त्यास अनुसरुन आज दिनांक २०/०१/२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साो, कोल्हापूर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील साो, गडहिंग्लज विभाग, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री समीरसिंह साळवे, इचलकरंजी विभाग, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.अजित टिके, शहर विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर,मोटर परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक श्री रजपूत, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार मोरे यांचे उपस्थितीत पोलीस मुख्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे एकूण ३८९ वाहनांचे लिलावाची प्रक्रियेसाठी प्रत्येक लिलाव धारकाकडून २५,०००/- अनामत रक्कम व २०००/- रुपये लिलावात भाग घेण्यासाठी जमा करणेत आले. सदर लिलावाकरीता ६७ अधिकृत व्यापा-यांनी सहभाग नोंदविला. लिलावाची बोली ७,००,०००/- रुपये पासून सुरु करणेत आली. लिलाव प्रक्रियेत वजीर स्क्रैप मर्चेंट सांगलीचे वजीर गुलाब तासगांवकर रा.घर नं.४२३, खानबाग, मकान गल्ली, मिरज, जि. सांगली यांनी २२,१५,०००/- रुपये रक्कमेची सर्वाधिक बोली लावली. त्यांना सर्व वाहने स्क्रैप करुन तसेच ती पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत याबाबतचे हमीपत्र घेवून त्यांचेकडे स्क्रैप वाहने देण्यात येणार आहेत. लिलावाची प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे पुर्ण करणेत आली असून सदरची रक्कम महाराष्ट्र शासनाकडे जमा करणेत येणार आहे.
अशा प्रकारे वर्षानुवर्षे पोलीस ठाणेच्या आवारात पडलेल्या बेवारस वाहनांचा कायदेशीर पध्दतीने लिलाव करुन पोलीस ठाणेचा परिसर मोकळा व स्वच्छ करणेत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास यश आलेले आहे. तसेच अभिलेखावर वर्षानुवर्षे आढळून येणा-या परंतू निर्गती होत नसलेल्या वाहनांची संख्या देखील कमी करणेत आलेली आहे. तसेच मा. मुख्यमंत्री साो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी जाहिर केलेल्या ०७ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून सुरु करणेत आली आहे.
इचलकरंजी उपविभागीय कार्यलायातुन प्रक्रिया.
वाहन लिलावांसाठी लागणारी पुर्ण प्रक्रिया इचलकरंजी येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यलायातुन यशस्वीपणे राबवण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800