इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील, पदभार स्वीकारला
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार पल्लवी पाटील यांनी स्वीकारला आहे. ओमप्रकाश दिवटे यांनी मॅटमध्ये केलेली तक्रार मागे घेतल्याने जुन्या आदेशावरूनच पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला. गेल्या काही दिवसांपासून आयुक्त बदलण्याबाबत प्रशासकीय स्तरावर आणि मंत्रालयात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती.ओमप्रकाश दिवटे यांच्याबाबत अनेकवेळा तक्रारी झाल्याने त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरत होती,त्यातच शासनाने त्यांचे प्रशासकीय अधिकार काढून घेतल्याने त्यांची कोंडी झाली होती..
महानगरपालिकेतील अति आयुक्त तसेच उपायुक्त पदभार स्वीकारण्याच्या वेळी अनुपस्थित होते. मात्र, उपायुक्त स्मृती पाटील यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. तसेच नगरसचिव विजय राजापूरे, आरोग्य अधिकारी सुनीलदत्त संगेवार, प्रदीप झमरी, सदाशिव शिंदे, बाळासाहेब कलागते यावेळी उपस्थित होते.
नव्या आयुक्तांकडून विकासकामांना वेग मिळण्याची अपेक्षा
इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध प्रलंबित प्रकल्पांना आणि शहराच्या विकासकामांना गती मिळावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि रस्ते विकास यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर नव्या आयुक्तांकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
माजी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचा पुढील पदभार अद्याप निश्चित नसल्याने त्यांच्या नव्या नियुक्तीबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. दरम्यान, नव्या आयुक्तांकडून लवकरच प्रशासनातील विविध विभागांची आढावा बैठक घेतली जाईल आणि येत्या काळात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, अशी माहिती मिळत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







