इचलकरंजीत रविवारी १४ वा एच. आय.व्ही.पॉझीटिव्ह वधू-वर परिचय मेळावा
इचलकरंजी
गेल्या ३६ वर्षापासून HIV एड्स ही समाजापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात तर २५,००० चे वर एड्सग्रस्त आहेत.एच.आय.व्ही. पॉझीटिव्ह व्यक्तीपुढे आणि त्यांच्या कुटुंबापुढे आज अनेक समस्या आहेत. एच.आय.व्ही. असून विवाह करण्याची इच्छा आहे पण इच्छुक वधू-वरचा परिचय नसणे ही त्यापैकी एक समस्या आहे. इचलकरंजी माई आधार केंद्रात १९९७ पासून आजअखेर एच.आय.व्ही. पॉझीटिव्ह ३५०० हुन अधिक रूणांची नोंद असून त्यापैकी ५०० चे वर रुग्ण हे ए. आर.टी. औषधोपचारावर आहेत. त्यांना सवलतीच्या दरात औषधे दिली जातात.आपल्या देशात एच. आय. व्ही. बाधितांना समाजाकडून सामंजस्याची व सर्वच कार्यात सामावून घेण्यासाठी जवळीक साधावी यासाठी ३६ वर्षापासून अनेकविध मार्गांनी समाजप्रबोधनपर कार्यक्रम आखले जात आहेत.प्रामुख्याने सरकारी, निमसरकारी,एन.जी.ओ,दूरदर्शन, आकाशवाणी इ.च्या माध्यमातून हे काम चालू आहे.इचलकरंजी व परिसरातून ७५०० च्या वर रुग्ण हे ART औषोधोपचारावर आहेत त्यामुळे मरणाऱ्यांची संख्या शून्यावर आली आहे.
सदरच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून येथील मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी,माई आधार केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने एच. आय. व्ही. पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी सर्व धर्मीय १४ वा वधू-वर परिचय मेळावा आयोजीत केला आहे. रविवार दि. ०९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्व सौ.प्रतिभा बाळासाहेब लांडे सांस्कृतिक भवन (टी. बी. क्लिनिक) माई आधार केंद्र, यशवंत प्रोसेस जवळ, इचलकरंजी येथे होणार आहे. पात्र तसेच इच्छुकांना या मेळाव्यात सहभाग घेता येईल.
या उपक्रमांमध्ये सहभाग घेणाऱ्या वधू-वरां विषयीची सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते.मेळाव्यात सहभाग घेवू इच्छिणाऱ्यांनी दि. ५ मार्च २०२५ पर्यंत दोन रंगीत फोटोसह नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांकडे एच.आय.व्ही व CD4 चा ६ महिन्याचे आतील रिपोर्ट असणे आवश्यक आहे. तसेच पूर्वी लग्न झालेले असल्यास जोडीदाराचा मृत्यूचा अथवा घटस्फोटाचा दाखला असणे आवश्यक आहे. मेळाव्याच्या प्रवेशाबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. आजअखेर या परिचय मेळाव्यातून १०० सुयोग्य अशा जोडीदारांची लग्ने झाली आहेत.
माई आधार केंद्र-मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी ही संस्था सातत्याने इचलकरंजी शहर व परिसरात वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहे, तर रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल ही संस्था नियमितपणे सामाजिक, वैद्यकिय व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. या दोन्ही संस्थाच्या वतीने शहरात गेली १४ वर्षे अशा प्रकारचा उपयुक्त उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.माई आधार केंद्र कार्यालय (०२३०) २४३७४१९/९३२५२४००५४/९८९०४४७४१९, यावेळी मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी चे अध्यक्ष डॉ. नितीन जाधव,सेक्रेटरी डॉ. अमित देशमुख,माई आधार केंद्राचे इनचार्ज डॉ. ए. के. चौगुले व को-इनचार्ज डॉ. अर्जुन घट्टे,डॉ.सी. डी. लिगाडे व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे प्रोजेक्ट कमिटीचे अध्यक्ष रो. सतिश पाटील,सेक्रेटरी – रो. नागेश दिवटे,कम्युनिटी सर्विस डायरेक्टर- रो. राम मुंदडा उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800