सोसायटीधारक ७ कोटी मुद्दल भरणार, एकरकमी परतफेड योजना राबवण्याची मागणी
इचलकरंजी:
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील यंत्रमाग सोसायटी चालकांनी कर्जाच्या परतफेडीपोटी ७ कोटी रुपये भरणा करण्याचा निर्णय सोमवारी जिजामाता मार्केट येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्या अनुषंगाने बैठकीतच २ कोटी रुपये देण्यात आले. तर उर्वरीत रक्कम २५ मार्चपर्यंत जमा करण्यात येणार आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात असलेल्या यंत्रमाग सोसायटीधारकांनी एनएसीडीच्या वतीने कर्जपुरवठा करण्यात आला होता. या कर्जाची वसुली वस्त्रोद्योग सोलापूर विभागामार्फत दरवर्षी केली जाते. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग सहकारी संस्था महासंघाच्या वतीने सहकार्य केले जाते. त्याच अनुषंगाने सोमवारी जिजामाता मार्केट येथे बैठक पार पडली. या बैठकीस वस्त्रोद्योग सोलापूर विभागाचे तांत्रिक अधिकारी अर्जुन गोरे व अंबादास पोकल यांच्यासह २०० पेक्षा अधिक सोसायटीधारक उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग सहकारी संस्था महासंघाचे अध्यक्ष सुनिल तोडकर होते.
बैठकीत यंत्रमाग सोसायटीच्या कर्जापोटी साध्या यंत्रमाग सोसायटीधारकांनी १ लाख, मध्यम सोसायटीधारकांनी २ लाख आणि ऑटोलूम व प्रक्रिया संस्था चालकांनी ५ लाख रुपये भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने २५ मार्चपर्यंत ७ कोटी भरण्याचे उदिष्ट ठेवले आहे. जे सोसायटीधारक नियमित हप्ते भरणार नाहीत त्यांच्यावर प्रसंगी कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी उपस्थित अधिकार्यांनी दिला.
यावेळी राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी, राज्यातील कुक्कुटपालन व मत्स्य उत्पादन संस्थांसाठी एकरकमी परतफेड योजना राबविली जात आहे. त्याच धर्तीवर नियमितपणे कर्जफेड करणार्या यंत्रमाग सोसायटीधारकांसाठीही योजना राबविण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी मेट्रो हायटेकचे सुरेशदादा पाटील, ओमजी पाटणी आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस धनराज खंडेलवाल, दिलीप मुथा, महेश पाटील, ऋषिकेश गौड, हारूण पाणारी यांच्यासह दोनशेहून अधिक यंत्रमाग सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800