काश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेचे मोर्चाद्वारे निवेदन
इचलकरंजी:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हिंदू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद इचलकरंजी शाखेने आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्याद्वारे निवेदन पाठवले. या निवेदनामध्ये त्यांनी केंद्र सरकारकडे काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करून जिहादी अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात २६ हिंदू पर्यटकांची धर्म विचारून निर्दयीपणे हत्या करण्यात आली. अनेक जण गंभीर जखमी झाले असून, हा हल्ला देशाच्या सार्वभौमत्वावर तसेच हिंदू समाजावर थेट आक्रमण आहे. यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील पर्यटकांचा समावेश होता.
हल्ल्यातील एक हृदयद्रावक घटना म्हणजे नवविवाहितेच्या समोरच तिच्या पतीची हत्या, ही घटना देशाला हादरवून टाकणारी ठरली. सोशल मिडियावर प्रसारित होणाऱ्या व्हिडीओंमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, हा हल्ला केवळ हिंसाचार नसून, तो जिहादी मानसिकतेचा भाग आहे. गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमध्ये हिंदू व्यावसायिक, कर्मचारी, आणि काश्मीरी पंडित यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रयत्नांनाही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
विश्व हिंदू परिषदेने काश्मीर खोऱ्यात व्यापक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून अतिरेक्यांचा बीमोड करावा.
सतत हल्ले होणाऱ्या परिसरांमध्ये कायमस्वरूपी लष्करी तळ उभारावेत.हिंदू पर्यटक, व्यावसायिक आणि काश्मीरी पंडित यांना विशेष सुरक्षा द्यावी.
हल्ल्यामागे असलेल्या स्थानिक संघटना, नेते आणि राजकीय पक्षांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर आतंकवादविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी अशा मागण्या केल्या आहेत
यावेळी प्रवीण सामंत,अमित कुंभार,गणेश कांदेकर,सुजित कांबळे,राहुल बोरा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो-
मोर्चात सहभागी झालेले हिंदुत्ववादी नागरिक.
प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देताना हिंदुत्ववादी कार्यकर्ते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800