छत्रपती शिवराय म्हणजे आजही अनुकरणीय, परीपूर्ण व्यक्तीमत्व
– सुनील नायर, ठाणे
इचलकरंजी दि.१५ मे –
“छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ३५० वर्षांपूर्वीचे युद्धशास्त्र जाणणारे राजे नव्हते, तर ते परीपूर्ण आणि आजही अनुकरणीय असे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे. इतिहासात कुठेही त्यांच्या जीवनात एकही उणीव आढळून येत नाही. आज २१व्या शतकातील व्यवस्थापन, प्रशासन आणि लोककल्याणासाठीही ते सर्वात मोठे आदर्श आहेत. महाराजांचे चरित्र हा केवळ आपला गौरवशाली इतिहास नाही, तर तो वर्तमानातील संकटांवर मात करून यशस्वी होण्यासाठीची मोठी प्रेरणा आहे” अशा आशयाचे विचार प्रसिद्ध, शिवचरित्र आणि मराठा इतिहासाचे अभ्यासक सुनील नायर (ठाणे) यांनी व्यक्त केले.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फाउंडेशन आणि रोटरी क्लब सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत’ चौथ्या दिवशी ते बोलत होते. ‘छत्रपती शिवराय… केवळ इतिहास नाही तर वर्तमानातील प्रेरणा’ हा त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य विषय होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वक्त्यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मर्दा फौंडेशनचे विश्वस्त श्यामसुंदर मर्दा यांच्या हस्ते पाहुण्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली तर रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष घनश्याम सावलानी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले तर संतोष आबाळे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
आपल्या व्याख्यानामध्ये नायर यांनी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. ते म्हणाले “शिवाजी महाराज म्हणजे कर्तुत्वाचा वटवृक्ष होता. त्यांची सर्व कामे अचूक आणि खूप नियोजनबद्ध होती, अथक सावधपणा, सतत प्रसंगावधान हे त्यांचे उत्तम गुण होते. ते कल्याणकारी दूरदृष्टीचे आणि उत्तम धोरण असणारे राजे होते. योग्य वेळी योग्य निर्णय आणि आवश्यक ते सर्व बदल वेळोवेळी करणे हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आजच्या तरुणांनी शिवचरित्रातून घेतली पाहिजे. महाराजांचे आरमार धोरण, पर्यावरण रक्षण, स्त्री सन्मान, आणि कोणत्याही प्रकारे जात धर्म वगैरे न पाहता सर्वांना औदार्याने वागवणे हे घटक आजही सर्व राज्यकर्त्यांना मार्गदर्शक आहेत.”
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात नायर यांनी शिवरायांच्या जीवनाचा आणि कर्तुत्वाचा सविस्तर आढावा घेतला. “छत्रपती शिवरायांना, त्यांच्या कर्तृत्वामुळे लोकांनी ईश्वर मानले पण आज त्यांचे अधिकच दैवतीकरण होताना दिसते आहे. आपण एखाद्या महामानवाला ज्यावेळी देव करतो, त्यावेळी त्यांचा अभ्यास थांबतो. त्यांचे विचार आणि आदर्श गोष्टींचे पालन आणि अनुकरण करण्याऐवजी विभूतीकरणालाच महत्त्व येते” अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. “सर्वसाधारणपणे शिवरायांच्या जीवनातील अफजलखान, शाहिस्तेखान, औरंगजेब, इत्यादी संदर्भातील नाट्यमय प्रसंग सर्वांना माहिती आहेत. पण त्या पलीकडे जाऊन शिवरायांचे विचार आणि सर्वच बाबतीमधील त्यांचा व्यापक दृष्टिकोन नागरिकांच्या समोर आला पाहिजे. त्यांच्याविषयी वाचनासाठी खूप चांगले साहित्य उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी त्याचे जरूर वाचन करावे” असे आवाहनही त्यांनी केले.
“किल्ल्यांचे बांधकाम असो वा स्वराज्याची आर्थिक घडी बसवणे असो, राजभाषा कोष निर्मिती असो, शत्रुची बित्तंबातमी ठेवणे असो, अशा सर्वच बाबतीत महाराजांची दूरदृष्टी अफाट होती. त्यांनी रयतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या आदर्श प्रेरणेने सामान्य जनतेनेही शत्रू विरुद्ध लढा दिला. त्यामुळे स्वराज्य स्थापन झाले आणि त्यानंतर तर शेकडो वर्षे मराठा साम्राज्य उभे राहिले.
म्हणूनच आजही कोणत्याही संकटात सामान्य माणसाला शिवरायांचेच नाव आठवते” असेही नायर यांनी नमूद केले. आपल्या ओघवत्या आणि माहितीपूर्ण शैलीत अनेक ऐतिहासिक दाखले देत त्यांनी श्रोत्यांना उत्तम व्याख्यानाची अनुभूती दिली. येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट हाॅलमध्ये सदरचे व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानमालेच्या या सत्राला इचलकरंजीतील इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरातून अनेक श्रोत्यांनी नायर यांच्याशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




