ICHMH51NEWS.IN
9921600800

आपण निसर्ग जपला तर तो आपणास जपेल – प्रसाद गावडे, सावंतवाडी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपण निसर्ग जपला तर तो आपणास जपेल – प्रसाद गावडे, सावंतवाडी 

“आपल्या शेतकरी, आदिवासी आणि ग्रामीण बांधवांनी पिढ्यानपिढ्या शेती, जंगले, नद्या आणि डोंगर सांभाळले, वाचवले, तेच आपल्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत, उपेक्षित आहेत. त्यांनी एकप्रकारे निसर्ग जपला आहे आणि आपण निसर्ग जपला तर तो आपणास जपेल, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. त्यासाठी शाश्वत जीवनशैलीचा अधिकाधिक प्रसार होणेही आवश्यक आहे” अशा आशयाचे विचार कोकणी रान माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले प्रसाद गावडे, सावंतवाडी यानी व्यक्त केले.
त्यांनी कोकणातील, ग्रामीण भागातील समृद्ध निसर्गाची उदाहरणे देत, निसर्गासोबत राहणे ही गरज नसून ती काळाची मागणी असल्याचे अधोरेखित केले.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४८व्या वर्षातील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी कोकणी रान म्हणून प्रसिद्ध असलेले व्याख्याते प्रसाद गावडे यांनी ‘ज्यांनी निसर्ग जपला तेच वंचित का?’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुणे अतुल शहा व हिराचंद बरगाले तसेच रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष घनश्यामजी सावलानी, मनोरंजन मंडळ अध्यक्ष समीर गोवंडे आणि मर्दा फौंडेशनचे श्यामसुंदर मर्दा यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत आणि प्रस्तावना उमेश कुलकर्णी यांनी केली तर वक्त्यांचा परिचय पद्माकर खोत यांनी करून दिला.
आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी वक्तृत्वातून प्रसाद गावडे यांनी कोकणातील माती, जंगल, देवराया, पारंपरिक जीवनशैली, गावकुस आणि निसर्गाशी असलेल्या माणसाच्या नात्याचा संवेदनशील वेध घेतला. विकास आणि पैशांच्या मागे धावताना माणूस नकळत पर्यावरणाचा समतोल बिघडवत असून त्याचे परिणाम पावसाचे कमी होणारे प्रमाण, बदलते हवामान आणि नष्ट होत चाललेली जैवविविधता यामधून स्पष्टपणे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
“निसर्ग आणि माणूस यांचे नाते तुटत चालले असून याला आपली भौतिकवादी, आधुनिक जीवनशैली कारणीभूत आहे. त्यामुळे केवळ पर्यावरणावर बोलून चालणार नाही, तर आपल्या जगण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. निसर्ग जपणाऱ्या माणसांना आपण हक्काच्या प्राथमिक सुविधा आणि आरोग्य सुविधा देऊ शकत नाही, ही खेदाची बाब आहे.” अशा प्रकारची खंतही त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
इचलकरंजीसारख्या औद्योगिक शहरात निसर्गाचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान असून, येथील नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. “आपण निसर्गाचे मालक
नाही, तर त्याचे केवळ विश्वस्त आहोत. जर आज आपण निसर्ग जपणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभे राहिलो नाही, तर भविष्यात निसर्गही आपल्या पाठीशी राहणार नाही.” अशा आशयाचे मत त्यांनी व्यक्त केले. “आज जीवनात आपण साधेपणा जपण्याची गरज असून त्यासाठी म. गांधी यांचा विचार महत्त्वाचा आहे. केवळ नोटेवरील गांधी हवेत असे नको तर विचारातले गांधी हवेत” अशा आशयाचे भाष्य गावडे यांनी केले.
आपल्या भाषणात गावडे यांनी ‘कोकणी रान माणूस’ या सोशल मीडिया उपक्रमामधून आपण कोकणातील जंगल, खाद्यसंस्कृती, पारंपरिक जीवनशैली, देवराया आणि जैवविविधतेची माहिती लोकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवत आहोत, याची माहिती दिली. तसेच ‘स्वदेश – बॅक टू द व्हिलेज’, ‘जीवनशाळा’, ‘मातीची घरं वाचवा’ यांसारख्या उपक्रमांतून शहरातून पुन्हा गावाकडे येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना शेती, पर्यावरण, स्वावलंबन आणि शाश्वत जीवनशैलीचे मार्गदर्शन करत असल्याचेही सांगितले.
गावडे यांची भाषणाची सहज शैली, कोकणी भाषेचा लहेजा त्याचबरोबर विषयाची सखोल मांडणी यामुळे त्यांचे व्याख्यान प्रभावी ठरले. येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट हाॅलमध्ये सदरची व्याख्यानमाला सुरू असून या निमित्ताने इचलकरंजीतील निसर्गप्रेमी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. व्याख्यानानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी तितक्याच आत्मीयतेने उत्तरे दिली. या कार्यक्रमामुळे पर्यावरणाप्रती असलेली आपली जबाबदारी आणि निसर्ग रक्षणासाठी काय करता येईल हा विचार श्रोत्यांच्या मनात रुजला, असे म्हणता येईल.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा