इचलकरंजीत गुरुवारी श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह प्रचार प्रसारार्थ सत्संग सोहळा
इचलकरंजी:
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या वतीने श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त प्रचार प्रसारार्थ गुरुपुत्र चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताह अंतर्गत गुरुवार 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजता इचलकरंजीतील आसरानगर बस स्टॉपसमोरील पद्मप्रताप मल्टीपर्पज हॉल येथे भव्य सत्संग सोहळा व अमृततुल्य हितगुज कार्यक्रम होणार आहे. परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक, आध्यात्मिक व राष्ट्रहिताचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून आयुर्वेद, अध्यात्म, वास्तुशास्त्र, स्वयंरोजगार, हस्तशास्त्र, ज्योतिषशास्त्र, भारतीय अस्मिता तसेच मानवी जीवनाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात चंद्रकांत दादासाहेब मोरे हे प्रबोधनात्मक हितगुज करणार असून समाजसेवा आणि अध्यात्म यांचा समन्वय साधणार्या विविध उपक्रमांची माहिती देणार आहेत. त्यामध्ये मोफत आरोग्य शिबिरे, औषध वाटप, महावस्त्रदान, अन्नदान, स्वच्छता अभियान आदी सामाजिक कार्यांचा समावेश आहे. या सत्संग सोहळ्यास सेवेकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





