ICHMH51NEWS.IN
9921600800

ट्रेडिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार; यंत्रमाग मजुरी आंदोलनाला नवे वळण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेडिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार; यंत्रमाग मजुरी आंदोलनाला नवे वळण

इचलकरंजी :
खर्चीवाला यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्रेडिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. संघटित गुंडांमार्फत जीवे मारण्याच्या धमक्या देणे, दहशत निर्माण करणे, खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी देणे तसेच कटकारस्थान रचल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे शहाजी भोसले आणि शिवसेना प्रणित यंत्रमाग संघटनेचे नंदकुमार लोखंडे यांनी ही तक्रार दिली.
गेल्या 23 दिवसांपासून खर्चीवाला यंत्रमागधारक मजुरीवाढीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, ट्रेडिंग असोसिएशनकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकींनाही असोसिएशनचे प्रतिनिधी अनुपस्थित राहत असल्याने मजुरीवाढीचा प्रश्न अधिकच चिघळल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शनिवारी कोल्हापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांनी याच विषयावर बैठक आयोजित केली होती. बैठकीला ट्रेडिंग असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहण्यास तयार नसल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. त्याच दिवशी काही संतप्त व्यक्तींनी ट्रेडिंग असोसिएशनचे सदस्य घनश्याम इनानी यांच्या निवासस्थानावर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून कारवाईची मागणी केली होती.
या प्रकरणात नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले आणि विशाल पाडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कारखानदार मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमा झाले होते आणि त्यांचीही तक्रार नोंदवून घेण्याची मागणी करण्यात आली होती.
यानंतर रविवारी नंदकुमार लोखंडे आणि शहाजी भोसले यांनी ट्रेडिंग असोसिएशनचे अध्यक्ष रामपाल भंडारी तसेच सदस्य घनश्याम इनानी, विनोद कांकानी, ओमप्रकाश काबरा, सिताराम बजाज, जगदीश छाजेड, कमलकिशोर राठी आणि जितेंद्र पारीख यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारा लेखी अर्ज शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिला.
या तक्रारीमुळे आधीच तापलेल्या मजुरीवाढ आंदोलनाला नवे वळण मिळाले असून, यंत्रमाग उद्योगातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. पोलिस प्रशासन या तक्रारीची पडताळणी करून पुढील काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा