इचलकरंजीत बनावट दारू तयार करणाऱ्या रॅकेटवर छापा – ३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजी येथे बनावट दारू तयार करण्याच्या प्रयत्नांवर मोठी कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे इचलकरंजी शहरातील काडापुरे तळ येथे छापा टाकून स्पिरीटने भरलेली तवेरा कार (पांढऱ्या रंगाची) ताब्यात घेतली. या कारवाईत एकूण १७ प्लास्टिक कॅनमधील स्पिरीट (किंमत २०,४०० रुपये) आणि वाहनासह ३,२०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अरुण विष्णु शेवाळे (वय ३८, रा. घोडकेनगर, इचलकरंजी) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने हे स्पिरीट विजय भाटले (रा. घोडकेनगर, सध्या निपाणी, कर्नाटक) याच्या सांगण्यावरून बनावट दारू तयार करण्यासाठी नेत असल्याची कबुली दिली.
सदर प्रकरणी प्रोव्हीबिशन कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अरुण शेवाळे याला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त तवेरा कार आणि स्पिरीट पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध दारूविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, तसेच पोलीस अंमलदार प्रदिप पाटील, प्रशांत कांबळे, सागर चौगले, विशाल चौगले, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, योगेश गोसावी, संतोष बर्गे आणि अरविंद पाटील यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








