मराठी दिन महोत्सवानिमित्त बालनाट्यांचे वेधक सादरीकरण
इचलकरंजी
येथे मराठी भाषा दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी दिन महोत्सव’ या चार दिवसीय उपक्रमाच्या शुभारंभाच्या दिवशी सांगली, सातारा व हरिपूर येथील बालकलाकारांनी विविध सामाजिक आशयाची वेधक बालनाट्ये सादर करून विद्यार्थी रसिक आणि पालक रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अ.भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा यांच्यावतीने हा ‘बालनाट्य उत्सव’ सादर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल यतिराज भंडारी आणि नाट्य परिषद इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष व रंगकर्मी डॉ. एस. पी. मर्दा, रोटरी क्लब एक्झिक्युटिव्हचे संचालक अतुल शहा तसेच नाट्य संस्थांचे प्रतिनिधी उदय गोडबोले, सौ. अमिता काटकर, ईशान केसकर यांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना भंडारी यांनी “मराठी भाषा ही संपन्न व समृद्ध आहे त्यामुळे मराठीमधील नाटके, एकांकिका, बालनाट्ये ही देखील दर्जेदार आहेत आणि अशा बालनाट्यांचे आयोजन करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे” अशा आशयाचे उदगार काढले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे सेक्रेटरी नागेश दिवटे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी केले.
या दिवशी ‘सुखी सदऱ्याचा शोध’ हे पहिले बालनाट्य सस्नेह कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांगली यांनी सादर केले. लेखन व दिग्दर्शन उदय गोडबोले यांचे होते. एका कावळ्याच्या गोष्टीच्या माध्यमातून विविध पक्षी, प्राणी तसेच मानवी स्वभावांचा वेध या बालनाट्यातून घेण्यात आला. निसर्गाने प्रत्येक प्राणीमात्राला योग्य असे काम दिलेलं असून प्रत्येक घटकाने आपले काम उत्तम प्रकारे करणे आवश्यक आहे असा आशय या बालनाट्यात होता. या संघाने परिणामकारक सादरीकरण करून त्यांनी रसिकांची दाद मिळविली.
त्यानंतर ‘जादूचा दिवा’ हे बालनाट्य सौ. सुंदराबाई शंकरलाल मालू हायस्कूल, हरिपूर या संघाने सादर केले. लेखन अरविंद लिमये यांचे होते तर दिग्दर्शन सौ. अमिता काटकर यांनी केले होते. आजच्या बदललेल्या जगात, विशेषतः मुलांमध्ये खाण्यापिण्याच्या आवडी बदलत असून फास्ट फूड, जंक फूडची भुरळ त्यांना पडते आहे. पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते हानिकारक आहे, त्यामुळे मुलानी आपला महाराष्ट्रीय चौरस आहार महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवावे असा संदेश या बालनाट्याने दिला.
कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात रसिक कला मंच आणि निर्मिती नाट्यसंस्था, सातारा या संघाने ‘पार्टी’ हे बालनाट्य विनोदी शैलीत पण प्रभावीपणे सादर केले. आजच्या काळातील शालेय मुले, त्यांच्या सवयी, पालकांच्या मुलांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा… या सर्वांवर या बालनाट्यातून विचारशील मांडणी करण्यात आली. एक चांगल्या आशयाचा कौटुंबिक अनुभव या बालनाट्याने दिला.
सादर करण्यात आलेली तीनही बालनाट्ये प्रेक्षकांपर्यंत चांगला आशय पोहचवणारी होती. साधारणपणे एकूण ७० बाल कलाकार आणि तांत्रिक सहाय्यकानी यामध्ये सहभाग घेतला. सर्वच बालनाट्यातील विद्यार्थ्यांनी सहज सुंदर अभिनयाचे दर्शन घडविले. बाल रसिक विद्यार्थी आणि पालकांचा या बालनाट्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन कपिल पिसे यांनी केले तर सचिन चौधरी यांनी आभार व्यक्त केले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सदरचा कार्यक्रम पार पडला.
मराठी दिन महोत्सवात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिनी गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी रात्री, मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त मराठीची वाटचाल दाखविणारा ‘इये मराठीचिये नगरी’ हा समुह नृत्ये आणि गीत संगीताचा कार्यक्रम श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार आहे.
जादूचा दिवा या बालनाट्यामधील एक दृश्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







