‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ नाटकाने दिला एक अस्वस्थ करणारा अनुभव
इचलकरंजी:
मराठी दिन महोत्सवाअंतर्गत येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाट्यकृतीने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांना एक आशयपूर्ण त्याचबरोबरीने अस्वस्थ करणारा असा अनुभव दिला. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हा नाट्य प्रयोग मराठी भाषा दिवसानिमित्त आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ रंगकर्मी आणि नाट्य शुभांगी, जयसिंगपूर या संस्थेचे अध्यक्ष सुभाष टाकळीकर, नाट्य परिषद इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. मर्दा, नाटकाच्या दिग्दर्शिका पायल पांडे व मार्गदर्शक प्रताप सोनाळे, निर्मिती प्रमुख प्रकाश रावळ तसेच इतर पदाधिकारी यांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अतुल शहा, नागेश दिवटे हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना टाकळीकर यांनी “मराठी नाटक हे संपन्न आहे, ठीकठिकाणी स्थानिक पातळीवर कलाकार चांगल्याप्रकारे रंगभूमीवर आपल्या कलाकृती सादर करीत असतात. त्याना प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला पाहिजे तरच ही कला अधिक उत्तमपणे पुढे वाटचाल करीत राहील.” अशा आशयाचे उदगार काढले. यावेळी मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर डॉ. मर्दा यांनी प्रास्ताविक केले.
तिचे संदर्भ या नाटकाने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अनेक मानाचे पुरस्कार मिळविले आहेत आणि कामगार राज्य नाट्य स्पर्धेत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक तसेच इतर तांत्रिक पुरस्कार प्राप्त केले आहेत. आजरा येथील राज्य नाट्य महोत्सवातही नाटकाने अनेक बक्षिसे मिळविली आहेत. या सर्व यशाबद्दल नाटकाशी संबंधित सर्व रंगकर्मींचा सन्मान यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उदघाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित ढवळे यांनी केले.
कथासूत्र सशक्त असेल तर दोनच पात्रांचे नाटक कसे परिणामकारक होऊ शकते याची अनुभूती या नाटकाने दिली. अनाथालयात वाढलेला आणि आता नोकरी करणारा ‘तो’ आणि पुर्वी ग्रामीण भागातील घरी, शेजारी काही एक अन्याय सहन केलेली आणि आता स्त्री मुक्ती चळवळीत काम करणारी ‘ती’ या दोघांची कथा या नाटकात होती. लग्नानंतर लगेचच काही मतभेद, नंतर काही काळच फुललेला त्यांचा संसार आणि त्यानंतर पुन्हा मतभिन्नतेमुळे विस्कटलेला त्यांचा संसार याची प्रत्ययकारी मांडणी नाटकात होती. दोघेही आपापल्या जागी बरोबर वाटत असले तरी छोट्या मोठ्या अहंकाराचा वाईट परिणाम कसा होऊ शकतो याची जाणीव या नाटकाने करून दिली.
नाटकाची मूळ सशक्त कथा राजन खान यांची असून त्याचे तितकेच उत्तम नाट्य रूपांतर डॉ. प्रमोद खाडीलकर यांनी केले आहे. नाटकाचे प्रभावी दिग्दर्शन पायल पांडे यांनी केले तर प्रसिद्ध रंगकर्मी प्रताप सोनाळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. नायकाच्या भूमिकेतील संतोष आबाळे आणि नायिकेच्या भूमिकेतील मानसी कुलकर्णी या दोघांनीही आपल्या उत्तम अभिनयाने हे नाटक यशस्वीपणे पेलून दाखवले. नाटकाचे सूचक असे नेपथ्य निखिल शिंदे यांनी केले तर पूरक अशी प्रकाश योजना आशिष भागवत यांची होती. अनुरुप असे पार्श्वसंगीत प्रताप सोनाळे यांचे होते. रंगभूषा सुनीता वर्मा यांची तर वेशभूषा स्नेहा वर्मा यांची होती. निर्मिती प्रमुख या नात्याने प्रकाश रावळ यांनी जबाबदारी पार पाडली.
एकंदरीतच सर्वांच्या उत्तम कामगिरीमुळे एक समंजस आणि जमलेला असा नाट्यप्रयोग रसिकांना अनुभवण्यास मिळाला. स्त्री आणि पुरुष हे समाजातील दोन्ही महत्त्वाचे घटक असून समजूतदारपणा असेल तर त्यांचे नाते उमलते अन्यथा अहंकारामुळे त्यांच्यात मोठी दरी निर्माण होऊ शकते याची अस्वस्थ करणारी अनुभूती या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांना दिली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या या प्रयोगास इचलकरंजी व परिसरातील जाणकार रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
* मराठी दिन महोत्सवात चौथ्या दिवशी शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी विविध ठिकाणी, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करणा-या, गायन समाज देवल क्लब कोल्हापूर प्रस्तुत अलमोस्ट डेड आणि फोर्थ वॉल थिएटर इचलकरंजी प्रस्तुत लॉटरी या दोन एकांकिका श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात रात्री होणार आहेत.
मराठी दिन महोत्सवानिमित्त आयोजित तिचे संदर्भ नसलेली गोष्ट नाटकातील दृश्य.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800