ICHMH51NEWS.IN
9921600800

जागतिक नृत्य दिनानिमित्त  इचलकरंजीत दिवसभर मनोहारी नृत्य सादरीकरण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जागतिक नृत्य दिनानिमित्त  इचलकरंजीत दिवसभर मनोहारी नृत्य सादरीकरण

इचलकरंजी –
जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून येथे सकाळी ६•४५ वाजल्यापासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कथक आणि भरतनाट्यम या शास्त्रीय शैलीतील ‘नुपूर नाद’ कार्यक्रमात अतिशय मनोहारी अशा स्वरूपाचे नृत्य सादरीकरण करण्यात आले. येथील पदन्यास नृत्यकला अकादमी, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व ॲनस् कमिटी आणि इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने इचलकरंजी नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचा शंभरहून अधिक विद्यार्थिनी नृत्य कलाकारांचा सलग नृत्याविष्कार कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला.
सकाळी कथ्थकमधील ताल त्रितालाने या उपक्रमाची सुरुवात झाली आणि दिवसभरात कथ्थक आणि भरत नाट्यममधील ७९ नृत्य आविष्कार विविध वयोगटातील विद्यार्थिनी कलाकारांनी सादर केले. सुरुवातीच्या गणेश वंदनेपासून शेवटच्या तत्कारापर्यंत पदन्यासच्या शंभरहून अधिक विद्यार्थिनींनी उत्साहात आणि तालबद्धपणे आपले नृत्य सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली. आजच्या काळातील दणदणाटी संगीत सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला येथील मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे, लेखिका व निवेदिका चित्कला कुलकर्णी, रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा चंदा कोठारी आणि पदन्यासच्या संचालिका सायली होगाडे व ज्योती सांगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सर्वांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी प्रेमलता सारडा, ट्रेझरर अर्चना मानधने, ॲनस् कमिटीच्या प्रेसिडेंट सविता पाटील या व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी पदन्यासचे अध्यक्ष संजय होगाडे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर संचालक सचिन चौधरी यांनी उदघाटन कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.
सदरच्या ‘नुपूर नाद’ या विशेष कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शन व मार्गदर्शन सायली होगाडे आणि ज्योती सांगले यांनी केले तर त्यांना सहकार्य रेश्मा कोंडेकर, मधुरा रानडे, सिद्धी भस्मे, साक्षी बारवडे आणि अदिती चिकोर्डे यांनी केले. या सर्वांनी सुरुवातीची गणेश वंदना सादर केली त्याचबरोबर विविध नृत्याविष्कार आणि समारोपाच्या तत्कार नृत्यात सहभाग घेतला. कार्यक्रमात दोन नृत्यांच्या व निवेदनाच्या मधील कालावधीतही कथ्थकच्या ताल त्रितालाचा ‘धा धिं धिं दा, धा तिं तिं ता’… हा घुंगरूनाद अखंडपणे सुरू ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रमात कथ्थक नृत्यामधील गणेश वंदना, सरस्वती वंदना, राम स्तुती, भजन, त्रिवट, तराना, मधुराष्टकम, त्रिताल, झपताल, शिखर ताल, मत्त ताल, धमार ताल व रूपक ताल सादर करण्यात आले, त्याचबरोबर भरतनाट्यम मधील गणेश वंदना, पुष्पांजली, हरिस्त्रोत्र, शिवपार्वती स्त्रोत्र, इत्यादी रचना सादर करण्यात आल्या. शास्त्रीय व निमशास्त्रीय ताल सादरीकरणाबरोबरच कार्यक्रमात शुभ घडी, जय जगदीश्वरी, हे गजवदना, श्रवण सुंदर, जग मे सुंदर है दो नाम, अधुरं मधुरम,  कृष्ण वंदना, अवघा रंग एक झाला अशा विविध गीतांवर आधारित शास्त्रीय नृत्याविष्कारामुळे उपस्थित रसिकांनी कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिला. शेवटी तत्कार आणि पसायदानाने सायंकाळी  साडेसहा वाजता नृत्याविष्काराची सांगता करण्यात आली.
जागतिक नृत्य दिनानिमित्त शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या अशा या कार्यक्रमास रोटरी प्रांत ३१७०चे पुढील वर्षीचे प्रांतपाल अरुण भंडारे व माधवी भंडारे, इनरव्हील क्लबच्या गतवर्षीच्या डिस्ट्रिक्ट  चेअरमन वैशाली लोखंडे तसेच हर्षदा मराठे, प्रेमा मर्दा, पल्लवी गोलंगडे, सुनिता मर्दा, सुमती अग्रवाल, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशनचे कार्यकारी विश्वस्त श्यामसुंदर मर्दा, पंडित बाळकृष्ण संगीत साधना मंडळाचे सेक्रेटरी उमेश कुलकर्णी, इचलकरंजी डान्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पवार, सेक्रेटरी सचिन पाटील व खजिनदार भरत ढवळे आणि संचालक मंडळ, ॲनस् कमिटीच्या शितल धड्ड, माधुरी बरगाले व सुजाता राठी, पत्रकार सुभाष भोसले त्याचबरोबर कला व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक रसिकांनी आवर्जून या कार्यक्रमास भेट दिली. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.
  • नुपूर साद कार्यक्रमात कलाविष्कार सादर करताना कलाकार
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा