ICHMH51NEWS.IN
9921600800

पूरसंकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क – हातकणंगले व शिरोळ तालुक्यांत उपाययोजना सुरू-प्रांताधिकारी दीपक शिंदे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पूरसंकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क – हातकणंगले व शिरोळ तालुक्यांत उपाययोजना सुरू-प्रांताधिकारी दीपक शिंदे

इचलकरंजी:

संभाव्य मुसळधार पावसाचे आणि पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांमध्ये प्रशासन सज्ज झाले आहे. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूरप्रवण गावांमध्ये पाहणी दौरे पार पडले असून, आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

Advt

पंचगंगा, कृष्णा आणि वारणा या तीनही नदी काठावरील गावांना दरवर्षी पुराचा मोठा धोका असतो. यंदा जून अखेरपर्यंत झालेल्या पावसाचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत अधिक असून, त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

प्रांताधिकारी शिंदे यांनी सांगितले की, संभाव्य स्थलांतर, तात्पुरत्या निवारा छावण्यांची जागा, मदत कार्य याविषयी प्रशासन सज्ज असून, संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुरस्थितीच्या संभाव्य प्रभावाचा विचार करता शिरोळ तालुक्यातील १८ गावे पूर्णतः आणि २४ गावे अंशतः, तर हातकणंगले तालुक्यातील तीन गावे पूर्णतः आणि १३ गावे अंशतः बाधित होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी या भागात सुमारे १.५३ लाख नागरिकांवर पुराचा थेट वा अप्रत्यक्ष परिणाम झाला होता. त्यापैकी हातकणंगले तालुक्यातील २८,३९४ आणि इचलकरंजी शहरातील ३८,००० नागरिकांना मोठा फटका बसला होता.

या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात ५४ आणि हातकणंगलेत २४ निवारा केंद्रे उभारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्य करता यावे म्हणून दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी १० बोटी  सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

याचबरोबर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी १५० ई-सेवा केंद्रांमार्फत शैक्षणिक दाखले जलद गतीने देण्याचे काम सुरू असून, ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवली जात आहे, असेही प्रांताधिकारी शिंदे यांनी स्पष्ट केले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा