इचलकरंजी आगारातून पुणे, नाशिक व मुंबईसाठी शिवाई बस सुरू करण्याची सुभाष मालपाणी यांची मागणी
इचलकरंजी :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) प्रदेशाध्यक्ष सुभाष खु. मालपाणी यांनी इचलकरंजी आगारातून लांब पल्ल्याच्या ठिकाणी शिवाई वातानुकूल बससेवा सुरू करण्याची मागणी परिवहन मंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांच्याकडे केली आहे.
मालपाणी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी हे महाराष्ट्राचे “वस्त्रोद्योग मँचेस्टर” म्हणून ओळखले जाते. या शहरात दररोज व्यापारी, शेतकरी व विविध राज्यांतील नागरिक रोजगार व व्यवहारासाठी ये-जा करीत असतात. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी व सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्येत वाढ होते. अशा काळात इचलकरंजी आगारातून पुणे, नाशिक व मुंबईसाठी सकाळी व रात्रीच्या सत्रात शिवाई बस सुरू केल्यास महामंडळाला मोठा महसूल मिळू शकेल.
याशिवाय, सध्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांची मक्तेदारी वाढली असून, नागरिकांना महागड्या दरात प्रवास करावा लागतो. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून शिवाई वातानुकूल बससेवा उपलब्ध झाल्यास प्रवाशांना स्वस्त व सुरक्षित सेवा मिळेल आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे मालपाणी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







