दिवाळी बाजार यंदा थोरात चौक येथे – मुख्य रस्त्यावर बाजारास बंदी
इचलकरंजी महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
इचलकरंजी –
शहरातील पारंपरिक दिवाळी बाजार यावर्षी मुख्य रस्त्याऐवजी कै. शिवाजीराव खवरे मार्केट, थोरात चौक येथे भरविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली. सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षांपूर्वी श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावरील एका दुकानाला आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. तेव्हा अग्निशमन दलालाही घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिस विभागाच्या मागणीनुसार आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत यंदाच्या दिवाळी बाजारासाठी नवीन ठिकाण निश्चित करण्यात आले.
Advt
यानुसार, मुख्य रस्त्याऐवजी दिवाळी बाजार कै. शिवाजीराव खवरे मार्केट, थोरात चौक येथे भरविण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार जिम्नॅशियम मैदान आणि नामदेव भवन मैदान या ठिकाणीही बाजार भरविला जाणार आहे. मुख्य रस्त्यावर विक्रेत्यांनी व्यवसायासाठी बसू नये तसेच दुकानासमोर मंडप टाकू नये, अन्यथा महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन संयुक्त कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच, फटाके विक्रीसाठी थोरात चौक ते राजीव गांधी भवन या रस्त्यावरच परवानगी दिली जाणार आहे. इतर ठिकाणी फटाके विक्री केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, विद्या कदम, सहा. आयुक्त रोशनी गोडे, विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, प्र. पोलिस निरीक्षक वायदंडे, पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील, मार्केट विभागाचे सदाशिव गोनुगडे, विधी अधिकारी ॲड. भावना देवडा, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिवाळी बाजार संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतला
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







