ICHMH51NEWS.IN
9921600800

निर्यात उद्योगातील संधी’ या विषयावर इचलकरंजीत आज कार्यक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निर्यात उद्योगातील संधी’ या विषयावर इचलकरंजीत आज कार्यक्रम

इचलकरंजी २९ :

वस्त्रोद्योग क्षेत्रातील उत्पादक, उद्योजक, निर्यातदार, एमएसएमई तसेच निर्यात व्यवसायात प्रवेश करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी टेक्सटाईल एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर (टी इ एफ सी), टेक्सटाईल कमिटी, इचलकरंजी यांच्या वतीने ‘निर्यात उद्योगातील संधी’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. ३० जून रोजी दुपारी ३.३० वाजता राधे बँक्वेट, इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दि इचलकरंजी पॉवरलूम वीव्हर्स को-ऑप. असोसिएशन, इचलकरंजी तसेच इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISFMA) यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या टेक्सटाईल कमिटीमार्फत देशातील सहा प्रमुख वस्त्रोद्योग क्लस्टर्समध्ये टेक्सटाईल एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर (टी इ एफ सी) स्थापन करण्यात आले असून, निर्यातविषयक मार्गदर्शन, उद्योगांना आवश्यक सहाय्य, शासकीय योजनांची माहिती, जागतिक बाजारपेठेतील संधी तसेच निर्यात प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. इचलकरंजी येथील TEFC च्या माध्यमातून स्थानिक वस्त्रोद्योगाला निर्यात क्षेत्रात अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

या कार्यक्रमामध्ये जागतिक वस्त्रोद्योगातील निर्यातीच्या संधी, नवीन आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रभावी पद्धती, निर्यात प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे, तसेच निर्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि विस्तारासाठी आवश्यक असलेल्या व्यावहारिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थानिक वस्त्रोद्योगाने जागतिक बाजारपेठेतील वाढत्या संधींचा लाभ घ्यावा आणि निर्यात क्षेत्रात अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. ओंकार हरी माळी उपस्थित राहणार आहेत. डॉ. माळी हे आयात-निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक आणि ‘उद्यमी महाराष्ट्र’ चे संस्थापक असून, सन २००९ पासून ते आयात-निर्यात क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यवस्थापन विषयातील डॉक्टरेट पदवीधारक असलेल्या डॉ. माळी यांनी हजारो युवक व उद्योजकांना आयात-निर्यात व्यवसायाचे प्रशिक्षण दिले असून, महाराष्ट्रातील अनेक उद्योगांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. मराठी भाषेत आयात-निर्यात व्यवसायाविषयी प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे.

सदर कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असून, सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रातील उत्पादक, उद्योजक, निर्यातदार, एमएसएमई तसेच निर्यात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवराज मार्गम, प्रभारी अधिकारी, टेक्सटाईल कमिटी, इचलकरंजी यांनी केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा