इचलकरंजी न्याय संकुलाच्या जागा हस्तांतरणासाठी १५.३३ कोटींचा निधी मंजूर
आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यास यश
इचलकरंजी :
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इचलकरंजीतील न्याय संकुलाच्या उभारणीला गती मिळाली असून न्याय संकुलासाठी आवश्यक जागा हस्तांतरणासाठी राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने १५ कोटी ३३ लाख ६० हजार ९४९ रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगण्यात आले.
इचलकरंजी शहरात जिल्हा व सत्र न्यायालय सुरू असले तरी विद्यमान इमारत अपुरी पडत असल्याने स्वतंत्र व सर्व सुविधांनी सुसज्ज न्याय संकुल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या पार्श्वभूमीवर बार असोसिएशनच्या माध्यमातून आमदार राहुल आवाडे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता.
न्याय संकुल व न्यायाधीश निवासस्थानासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या रि. स. नं. ६९० पै. व रि. स. नं. ४४४ पै. येथील आरक्षित क्षेत्रापैकी एकूण १ हेक्टर ३० आर जागा हस्तांतरित करण्यास महापालिकेने तयारी दर्शवली होती. संबंधित जागेचे मूल्यांकन १५.३३ कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले होते.
राज्य शासनाने निधी मंजूर करून जागा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपालांच्या आदेशानुसार विधी व न्याय विभागाने आदेश जारी केले असून यामुळे इचलकरंजीतील प्रस्तावित न्याय संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







