स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आंदोलन; वाढीव वीज बिलांची होळी करून निषेध
इचलकरंजी :
इचलकरंजी शहरातील घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला विरोध करत काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरणविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना निवेदन देऊन शहरात स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यभर गेल्या वर्षभरापासून महावितरणकडून पारंपरिक वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निर्णयाविरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व शेतकरी संघटनांकडून राज्यभर आंदोलन सुरू असून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक वीज बिले येत असल्याच्या तक्रारी समोर आल्याचा दावा करण्यात आला.
सामान्य घरगुती ग्राहकांवर आर्थिक भार पडत असून ग्राहकांची पूर्वसंमती न घेता मीटर बदलू नयेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच कोणत्या प्रकारचा मीटर वापरायचा याबाबत ग्राहकांच्या मताचा सन्मान राखला जावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
इचलकरंजी शहरातील स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी.घरगुती ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये.ग्राहकांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत. या मागण्या निवेदनाद्वारे करून तातडीने निर्णय न घेतल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिल आल्याचा दावा करण्यात आलेल्या वीज बिलांची प्रतीकात्मक होळी करून महावितरणचा निषेध नोंदविला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, नगरसेवक संजय कांबळे, बाबासो कोतवाल, शशिकांत देसाई, युवराज शिंगाडे, राजन मुठाणे, अजित मिणेकर, रविराज पाटील, पोपट शिंदे, सुदाम साळुंखे, रवी वासुदेव, चंद्रकांत मिस्त्री, अण्णा कांबळे, रवींद्र पाटील, प्रमोद नेजे, अनिल पच्छिंद्रे, दशरथ जावळे, रोहित जावळे, ताजुद्दीन खतीब, रमजान शिकलगार, राजू किणेकर व किरण भागवत उपस्थित होते.
स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करताना काँग्रेस पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







