श्रीमंत अनुबाईसाहेब घोरपडे यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन
इचलकरंजी (ता. २४) – स्वत: च्या पराक्रमाने, बुद्धीमत्तेने मराठी इतिहासात स्वत : चे नाव अजरामर करणाऱ्या
इचलकरंजी संस्थानच्या राणीसाहेब श्रीमंत अनुबाई घोरपडे यांच्या जीवनावरील रिजंट क्वीन ऑफ इचलकरंजी अनुबाईसाहेब घोरपडे या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी एन. के. फिरोदीया ऑडीटोरियम, भांडारकर इन्स्टीट्यूट, पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे.
खासदार मेधा कुलकर्णी यांच्या शुभहस्ते प्रकाशित होणाऱ्या या इंग्रजी पुस्तकाचे लेखन मोहिनी पेशवा करकरे यांनी केले आहे. पुस्तकाच्या लेखिका या इतिहासाच्या अभ्यासक असून पुण्याच्या पेशव्यांच्या १० व्या वंशज आहेत. या पुस्तक प्रकाशन समारंभास ज्येष्ठ इतिहासकार श्री. पांडुरंग बलकवडे आणि डॉ. उदय एस्. कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
श्रीमंत अनुबाईसाहेब घोरपडे या छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज यांचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या कन्या होत. इचलकरंजी संस्थानचे अधिपती श्रीमंत व्यंकटराव घोरपडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. श्रीमंत व्यंकटराव घोरपडे यांचे क्षयरोगाने निधन झाल्यावर मुलगा नारायण लहान असल्याने इचलकरंजी
संस्थानचे दीर्घकाळ प्रशासन त्यांनी केले. त्या स्वत: लढाईच्या मोहीमांमध्ये सहभागी होत असत. धैर्यवान, कर्तव्यनिष्ठ, प्रशासन कुशल आणि संकटांवर मात करीत इचलकरंजी संस्थान जपणारी आणि या संस्थानाचा
स्वत : च्या हिंमतीवर लौकिक वृद्धींगत करणारी पराक्रमी स्त्री, ही श्रीमंत अनुबाईंची वैशिष्ठ्ये आहेत. या, पुस्तकाच्या निमित्ताने श्रीमंत अनुबाईसाहेब यांच्या कर्तृत्त्वसंपन्न व्यक्तित्वावर आणि त्या काळाच्या इतिहासावर प्रकाशझोत दिला जात आहे. आजही इचलकरंजी मध्ये श्रीमंत अनुबाईसाहेब यांची स्मृती जपली जाते. त्यांच्या नावे एक शाळा कार्यरत असून आपटे वाचन मंदिरातील कलादालनात त्यांचे चित्र लावण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







