अडीच हजार दिव्यांगांचा महानगरपालिका मतदानावर बहिष्कार
हक्काचा ५ टक्के निधी न मिळाल्याने संताप तीव्र
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेने दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा ५ टक्के निधी न दिल्याचा आरोप करत शहरातील सुमारे २,५०० दिव्यांग नागरिकांनी आगामी महानगरपालिका मतदानावर बहिष्कार जाहीर केला आहे. प्रहार संघटना व इचलकरंजी दिव्यांग कृती समितीने आज दिव्यांग मतदान जनजागृती कार्यक्रमावर बहिष्कार टाकत तीव्र नाराजी व्यक्त केली.
महानगरपालिका स्थापन झाल्यापासून गेले तीन वर्षे दिव्यांगांना केवळ १३०० ते १४०० रुपयांची तुटपुंजी मदत देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. वार्षिक उत्पन्न सुमारे २०० कोटी रुपये असलेल्या महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी कायदेशीर बंधनकारक असलेला एकूण स्वउत्पन्नातील ५ टक्के निधी न देणे ही दिव्यांगांची मोठी फसवणूक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
२०२४-२५ मध्ये महापालिकेचे स्वउत्पन्न १९४ कोटी रुपये असून त्यातील ९ ते ९.५० कोटी रुपये दिव्यांग कल्याणासाठी राखीव असताना महिला व बालविकास विभागाचा चुकीचा शासन निर्णय दाखवून महापालिका दिव्यांगांचा निधी अडवत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यामुळे दिव्यांगांच्या उपजीविका, पुनर्वसन, रोजगार व इतर अत्यावश्यक योजनांवर विपरीत परिणाम झाला आहे.
दिव्यांग कृती समितीने इशारा दिला की,
“शासनाच्या योग्य जीआरनुसार ५ टक्के निधी मंजूर न झाल्यास इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दिव्यांग बांधव, त्यांच्या कुटुंबीयांसह मतदानाचा बहिष्कार करतील.”
याशिवाय, ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनी महानगरपालिका समोर काळे झेंडे दाखवून निषेध करण्याची घोषणाही करण्यात आली.
या आंदोलनात प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील, अध्यक्ष अनिल विजयनगर, इरफान बागवान, अंजना नेतले, दिव्यांग कृती समितीचे जीवन पोतदार, दिलीप शिंदे, भाजपा आघाडी अध्यक्ष भानुदास तासगांवे, संभाजी निबाळकर, महानंदा पाटील, मानवाधिकार संघटनेचे दादासो सुतार, मार्तंड कांबळे, संतोष यलगार आदी मान्यवर उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







