शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात अपघात प्रकरणी गुन्हा दाखल
इचलकरंजी :
राज मेटलसमोर कलानगर रिंगरोड येथे भरधाव वेगातील ट्रॅक्टर–ट्रॉलीने भेळगाड्यास दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडला.
फिर्यादी अभिषेक ओंकारनाथ हलवाई (वय २३, रा. अलायन्स हॉस्पिटल जवळ इचलकरंजी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे चुलते गोविंददास रामलखन हलवाई (वय ४५ रा. म्हसोबा गल्ली, पंचवटी टॉकीज मागे, इचलकरंजी) हे भेळचा गाडा घेऊन ए.एस.सी. कॉलेजकडे जात असताना, ट्रॅक्टर क्रमांक KA-23-TD-0253 (समोर पांढऱ्या कागदावर KA-23-TD-2573 बनावट नंबर लावलेला) आणि त्याला जोडलेल्या दोन ट्रॉली क्रमांक KA-23-TE-0655 व KA-23-TE-0656 यांनी भरधाव वेगात, दारूच्या नशेत बेदरकारपणे वाहन चालवत गाडीला जोराची धडक दिली.
या धडकेमुळे भेळगाडा पलटी होऊन तो प्रत्यक्ष पिडित गोविंददास हलवाई यांच्या अंगावर पडला. त्यांच्या चेहऱ्यावर, पाठीवर, पोटावर तसेच नाकाजवळ व कपाळावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी उपचारात असल्यामुळे तक्रार दाखल करण्यात विलंब झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
या प्रकरणी ट्रॅक्टर चालक अजित दिलीप घनवट (वय २९, रा. घनवट गल्ली, कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपास पो हे कॉ.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







