शिक्षणायन” वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन
इचलकरंजी –
इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवर्य वा. गो. गोगटे लिखित ‘शिक्षणायन’ या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन सोहळा बुधवारी व्यंकटराव हायस्कूल अॅण्ड जूनियर कॉलेजच्या पटांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. शिक्षण, समाजकार्य आणि साहित्यविश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक स्वरूप लाभले.
प्रकाशन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते संपन्न झाले. आपल्या मनोगतात त्यांनी शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना गोगटे यांच्या लेखनाची धडाडी, प्रामाणिकता आणि शिक्षकांसाठीचे मार्गदर्शकत्व विशेष अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गो. सि. ढवळे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी, शिक्षण ही केवळ अध्यापन प्रक्रिया नसून समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. ‘शिक्षणायन’ हा लेखसंग्रह त्याच जाणिवेला बळ देणारा ग्रंथ ठरेल, असे मत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंघचालक भगतराम छाबडा आणि साहित्यिक आनंद हर्डीकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या आव्हानांचा वेध घेत त्यांनी या पुस्तकाची गरज अधोरेखित केली. गुरुपत्नी उषा वा. गोगटे यांची उपस्थिती कार्यक्रमाचा भावनिक केंद्रबिंदू ठरली.
शहरातील अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीमुळे प्रकाशन सोहळा रंगतदार झाला. शिक्षणाच्या विविध अंगांवर भाष्य करणारा आणि विचारप्रवर्तनाला चालना देणारा ‘शिक्षणायन’ ग्रंथ शिक्षणविश्वासाठी मार्गदर्शक ठरेल, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
समारंभाचे स्वागत दी. रा. राशिनकर यांनी केले, तर प्रास्ताविक सुनील नवाल यांनी मांडले. पाहुण्यांचा परिचय स्वानंद कुलकर्णी यांनी करून दिला. शेवटी कौशिक मराठे यांनी आभार मानले. यावेळी सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य, व्यंकटराव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ. मो. कांबळे व समर्थ बाल व विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सु. बा. चौगुले आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
“शिक्षणायन” वैचारिक लेखसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी गिरीश प्रभुणे,लेखक ग.गो.गोगटे व मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







