एड्स दिनानिमित्त इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जनजागृती उपक्रम
इचलकरंजी – जागतिक एड्स दिन आणि एड्स निर्मूलन सप्ताहाच्या निमित्ताने इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यात आले. १ डिसेंबर रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जागतिक एड्स दिनाचा शुभारंभ झाला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ यांनी एचआयव्ही हा फक्त आरोग्याचा मुद्दा नसून सामाजिक संवेदनशीलतेची गरज भासवणारी समस्या असल्याचे सांगून जागरूकतेचे महत्त्व स्पष्ट केले. “Overcoming disruption, transforming the AIDS response” ही यावर्षीची थीम जाहीर करण्यात आली. इंदिरा गांधी रुग्णालयातील एआरटी केंद्राच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने राज्यातील पहिल्या दहा केंद्रांमध्ये इचलकरंजीची नोंद केली आहे. ६ डिसेंबर रोजी एड्सविषयक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. एचआयव्हीविरोधी शपथ घेतल्यानंतर हिरवा झेंडा दाखवून रॅली गोकुळ चौक, काजवे हॉस्पिटल रोड, शिवतीर्थ, शिवाजी पोलीस स्टेशन मार्गे परत रुग्णालयात आली. रॅलीमध्ये डॉक्टर, अधिपरिचारिका, परिचारिका, महाविद्यालयीन विद्यार्थी, नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी, सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमात डॉ. मानसी कदम, डॉ. प्रकाश मोरे, डॉ. सूर्यकांत खारगे, श्री. रमेश वर्धन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक राधिका कांबळे यांनी केले.
एड्स दिनाच्या कार्यक्रमाची दीपप्रज्वलन करून सुरवात करताना डॉ संतोष पोळ व अधिकारी, कर्मचारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







