स्मृतिजागर सांगता समारंभाचे रविवारी आयोजन
इचलकरंजी:
सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सुवर्ण महोत्सवी स्मृतीजागर सांगता समारंभ रविवार ता.२८ डिसेंबर २०२५ रोजी साजरा होत आहे .साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असून माजी मंत्री व स्मृतीजागरचे स्वागताध्यक्ष प्रकाशअण्णा आवाडे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. लातूरचे पोलिस उपअधीक्षक कवी समीरसिंह साळवे हे यावेळी प्रमुख उपस्थित असणार आहेत. श्री गजानन महाराज ( शेगाव )सर्व सेवा संस्थेच्या सहकार्याने संस्थेच्या सभागृहात,सांगली रोड,खोतवाडी, इचलकरंजी येथे हा सांगता समारंभ सकाळी ९.३० वाजता होणार आहे. त्याला इचलकरंजी व परिसरातील साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्मृती जागरच्या वतीने संकल्पक दिलीप शेंडे आणि प्रसाद कुलकर्णी, प्रा.रोहित शिंगे ,ॲड.माधुरी काजवे, वैशाली नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत केले.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली २६ ते २८ डिसेंबर १९७४ रोजी झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्मृती जागर सोहळा २६ डिसेंबर २०२४ रोजी इचलकरंजीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. हा स्मृतीजागर गेले वर्षभर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग अकरा साहित्यिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे .अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात अशा पद्धतीचा स्मृती जागर वर्षभर आपण इचलकरंजीकरांनी अतिशय उत्तम रीतीने राबवलेला आहे. त्याची नोंद मराठी साहित्य वर्तुळात घेण्यात आली आहे.आता त्याचा सांगता समारंभ होत आहे त्यात साहित्य रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्मृती जागरच्या वतीने या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







