जागरूक मतदारच सुदृढ लोकशाहीचे शिल्पकार ठरू शकतात – समाजवादी प्रबोधिनीच्या चर्चासत्रातील मत
इचलकरंजी:
अलीकडे नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी मतदारांना निरनिराळी अमिषे दाखवण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रमाणही धक्कादायक रीतीने वाढत आहे. हे लोकशाही पुढील मोठे आव्हान आहे.सत्ता निर्माण करण्यात आणि सत्तेवर नियंत्रण ठेवण्यात नागरिकांना सहभागी होता आले पाहिजे हे लोकशाही पद्धतीत गृहीत धरलेले आहे. त्यातूनच मताचा अधिकार बजावणे हा महत्त्वाचा आणि मूलभूत अविष्कार ठरत असतो. त्यामुळे मत हा आपला अधिकार आहे.ती दान करण्याची अथवा गहाण टाकण्याची किंवा विकण्याची वस्तू नाही याचे प्रत्येक मतदाराने ठेवून लोकशाही सक्षम करण्यात सहभाग नोंदवावा.जागरूक मतदारच सुदृढ लोकशाहीचे शिल्पकार ठरू शकतात असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित ” मतदार जागृती मोहीम” चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. यावेळी मतदार जागृती मोहिमेच्या फलकाचे अनावरणही करण्यात आले.या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, प्रा. रमेश लवटे, पांडुरंग पिसे, राजन मुठाणे, बजरंग लोणारी, शिवाजी शिंदे , उज्वला जाधव, संदीप चोडणकर,अन्वर पटेल,किरण कटके, अजित मिणेकर,शकील मुल्ला,महेंद्र जाधव, बाळासाहेब नरशेट्टी, महादेव मिणची, विनोद जाधव, नितेश घोडके, जतिन पोतदार आदींनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रातून असेही मत व्यक्त करण्यात आले की,आपले मत आपण डोळस पणे दिले पाहिजे. निवडणूक व्यक्ती केंद्रित अथवा उमेदवार केंद्रित नको तर मतदार केंद्रित असली पाहिजे.उमेदवारांकडून त्यांचा जाहीरनामा मागून घेऊन त्याच्या तुलनात्मक विचार करून मत दिले पाहिजे. आपण स्वतः व आपले कुटुंबही मताच्या बदल्यात कोणाकडे काहीही मागणार नाही याची खात्री स्वतःच स्वतःला देऊन आपला मताचा अधिकार आपण निर्भयपणे बजावला पाहिजे.
तसेच सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता,लोकांचे सार्वभौमत्व, लोकशाही ,समाजवाद, धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता आदी संविधानातील मूल्यांचा आदर व जोपासना करणाऱ्या उमेदवारांना मत दिले पाहिजे. या चर्चासत्रामध्ये निवडणूक कायद्यात सुधारणा होणे गरजेचे आहे हेही स्पष्ट करण्यात आले.
मतदार जागृती फलकाचे अनावरण करताना प्रसाद कुलकर्णी व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







