महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील ७८ इसम हद्दपार
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी, तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रशासनाने कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
पोलीस ठाण्याच्या अभिलेखातील रेकॉर्डवरील गुन्हेगार व सराईत गुंड यांच्यावर बी.एन.एस. एस. कलम १६३ (२) अन्वये निवडणूक कालावधीसाठी हद्दपारीची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक ११ जानेवारी २०२६ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत (मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क अबाधित ठेवून) शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ७८ इसमांना हातकणंगले तालुक्याबाहेर काढण्याचा प्रस्ताव माननीय कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर तहसीलदार, इचलकरंजी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने माननीय कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर तहसीलदार, इचलकरंजी यांनी संबंधित ७८ इसमांना सदर कालावधीत तात्काळ हातकणंगले तालुका सोडून जाण्याचे आदेश पारित केले आहेत. प्राप्त आदेश संबंधित इसमांना बजावण्यात आले असून, त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात आले आहे.
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी स्पष्ट केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







