मंत्र्यांना गाव बंदी संदर्भात सुळकुड समितीची पोलीस ठाण्यात बैठक
इचलकरंजी दि. ७ –
इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने इचलकरंजी शहरात सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत मंत्र्यांना बंदी अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजू ताशीलदार यांनी कृती समितीच्या सदस्यांची बैठक बोलवून त्यांची मते जाणून घेतली. यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी सुळकुड योजनेबाबत चालढकल होत असून मुख्यमंत्री महोदयांनी १ मार्च रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांना दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन अहवाल द्यायला किती दिवस लागणार असे विचारले असता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी १ महिन्यात अहवाल देतो असे सांगितले होते. त्यानुसार लगेच बैठक लाऊन निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. पाणी प्रश्न असल्याने कोणताही आचारसंहितेचा अडसर येणार नाही असे आवर्जून नमूद केले असतानाही त्यानंतर पाच महिने झाले, तरी कोणत्याही निर्णयापर्यंत जिल्हाधिकारी महोदय आलेले नाहीत. तसेच जिल्हाधिकारी यांनी अजून अहवाल पाठवला नाही. त्यामुळे ते कधी अहवाल पाठवणार व मुख्यमंत्री कधी बैठक लावणार व योजनेचा निर्णय होणार अशा संभ्रमावस्थेत नागरिक आहेत.
यामुळे कृती समितीने “इचलकरंजी शहरासाठी मंत्र्यांना गाव बंदी” चा निर्णय कायम करण्याचा ठराव ४ ऑगस्ट रोजीच्या बैठकीत करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी तातडीने अहवाल पाठवावा व मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेऊन निर्णय द्यावा असे मत समितीने मांडले. इथून पुढे इचलकरंजी शहरात कोणत्याही मंत्र्यांना येऊ देणार नाही. मंत्र्यांचा दौरा जाहीर होईल त्याच्या दोन दिवस अगोदर कृती समितीची भूमिका जाहीर करण्यात येईल असे ठामपणे सांगितले. यावेळी मदन कारंडे,संजय कांबळे, सुहास जांभळे,सदा मलाबादे, विकास चौगुले,प्रताप पाटील, सुनील बारवाडे,सयाजी चव्हाण, रसूल नवाब, वसंत कोरवी, अभिजीत पटवा, योगेश पंजवानी, शिवाजी शिंदे इ. उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृती समिती सदस्यांना नोटीसा.
रविवारी ११ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृती समितीच्या सदस्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम १६८ नुसार नोटिसा देण्याचे काम शिवाजीनगर पोलीस ठाण्याने सुरू केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800