ICHMH51NEWS.IN
9921600800

अमेरिका–इस्त्रायल–इराण युद्धाचे दूरगामी परिणाम; जागतिक अर्थकारणावर मोठा परिणाम – डॉ. श्रीराम पवार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिका–इस्त्रायल–इराण युद्धाचे दूरगामी परिणाम; जागतिक अर्थकारणावर मोठा परिणाम – डॉ. श्रीराम पवार

इचलकरंजी:
 औद्योगिक क्रांतीची चाके ही प्रामुख्याने ऊर्जा स्रोतांवर चालतात आणि या स्रोतांवरील नियंत्रण हेच भांडवलशाहीचे खरे सामर्थ्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक डॉ. श्रीराम पवार यांनी केले. समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अमेरिका–इस्त्रायल–इराण युद्धाचे परिणाम” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते.
डॉ. पवार म्हणाले, अमेरिका पश्चिम आशियातील राजकीय रचना युद्धाच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न करत असली तरी जगभरात शांततेची मागणी वाढत आहे. अमेरिकेसह अनेक देशांत लाखो लोक युद्धविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. हे युद्ध थांबले तरी त्याचे परिणाम दीर्घकाळ जाणवतील. शेती, खते, वस्त्रोद्योग, तेल, कोळसा व निर्यात यावर विपरीत परिणाम होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे. जागतिक जीडीपीमध्येही सुमारे एक टक्क्याने घट होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
युद्धात केवळ लष्करी ताकद नव्हे, तर नुकसान सहन करण्याची क्षमता महत्त्वाची असते. अमेरिकेचे पारडे जड असले तरी इराणची सहनशक्ती मोठी आहे. इराणची राजकीय व प्रशासकीय व्यवस्था मजबूत असल्याने नेतृत्वावर हल्ला करूनही सत्ताबदल सहज शक्य नाही. भूगोलही अमेरिकेसाठी आव्हानात्मक असल्याने थेट लष्करी विजय कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिका युद्ध नको म्हणत असली तरी प्रत्यक्षात युद्धात उतरते, ही धोरणात्मक विसंगती असल्याची टीका करत त्यांनी सांगितले की, या संघर्षात अमेरिका गुंतून राहणे हे चीनच्या दृष्टीने फायदेशीर आहे. भारताने या युद्धात संतुलित भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी सुचवले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. चौसाळकर यांनी सांगितले की, या युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार असून ते लवकरच थांबण्याची शक्यता आहे. इराणची लष्करी क्षमता अद्याप शिल्लक असून संघर्षातून अनेक नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले.

व्याख्यानात बोलताना डॉ श्रीराम पवार व्यासपीठावर भारती पाटील,अशोक चौसाळकर,प्रसाद कुलकर्णी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा